दौंड (अख्तर काझी) : राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक 5 मधील जवानांच्या बॅरेक मध्ये घुसून अज्ञात चोरट्याने जवानांचे मोबाईल व रकमेवर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जवान रिजवान फारूक सय्यद यांनी फिर्याद दिली. दौंड पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती ठाणे अंमलदार बापू रोटे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना 3 मार्च रोजी रात्री 10 वाजताच्या दरम्यान येथील राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक 5 मधील जवानांच्या ब्यारेक मध्ये घडली. फिर्यादी व त्यांचे सहकारी बँरेक मध्ये झोपलेले होते. रात्री 12.30 वा. दरम्यान फिर्यादी यांना जाग आली असता त्यांना त्यांचा मोबाईल आढळला नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या शेजारील सहकार्याला उठविले व सर्वत्र मोबाईलचा शोध घेतला. मोबाईल सापडला नाही.
दरम्यान असे निदर्शनास आले की ब्यारेक मधील आणखीन काही जवानांचे मोबाईल सापडत नाहीये. त्यामुळे त्यांची खात्री झाली की, अज्ञात चोरट्याने बरॅक मधील जवानांचे चार मोबाईल व रोख रक्कम तीन हजार रूपये असा एकूण 24 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार बापू रोटे करीत आहेत.