दौंड शहरातील एसटी पिकप स्टॅन्ड परिसरात महिलांची सुरक्षितता राम भरोसे, सीसीटीव्ही चा पत्ताच नाही

दौंड (अख्तर काझी) : पुणे शहरातील अत्यंत वर्दळीच्या असणाऱ्या स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची अत्यंत संतापजनक व धक्कादायक घटना घडली. घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या संतापजनक घटनेमुळे राज्यातील सर्वच बस स्थानके, एसटी डेपो, पिकअप स्टॅन्ड परिसरातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या घटनेनंतर दौंड मधील एसटी पिकअप स्टॅन्ड ची पाहणी केली असता, या ठिकाणी महिलांची सुरक्षितता रामभरोसेच असल्याचे चित्र पाहायला मिळाले. पूर्वी दौंड मधील नागरिकांना एसटीने प्रवास करावयाचा असल्यास त्यांना गावाबाहेरील एसटी डेपो किंवा येथील संत मदर तेरेसा चौकात (नगर मोरी) जाऊन एसटी पकडावी लागायची. प्रवाशांसाठी हे खूप गैरसोयीचे होते व याचा मोठा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत होता. त्यामुळे या मनस्तापातून प्रवाशांची सुटका व्हावी म्हणून आमदार राहुल कुल यांनी प्रशासनाकडे पाठ पुरावा करून शहरातील मध्यवर्ती ठिकाणी एसटी पिकअप स्टॅन्ड ची उभारणी केली.

सध्या येथून पुणे ,नगर, औरंगाबाद, सातारा, शिर्डी, बारामती शहराला जाणाऱ्या जवळपास 150 गाड्या येत- जात आहेत. शेकडो प्रवासी या पिकअप स्टॅन्ड वरून प्रवास करतात. असे असताना या पिकअप स्टॅन्ड परिसरात एकही सीसीटीव्ही लावलेला दिसत नाही. पोलीस प्रशासनाकडून येथे पोलीस बंदोबस्ताची सोय नाही. यामुळे परिसरातील महिलांची सुरक्षितता धोक्यात असल्याचे चित्र आहे. पिकअप स्टॅन्ड परिसरात प्रवाशांसाठी शौचालय बांधण्यात आलेले आहे, मात्र पाण्याअभावी ते बंदच ठेवण्यात आल्याचे दिसते आहे. त्यामुळे महिला प्रवाशांची मोठी कुचंबना होत आहे.

याबाबत पिकअप स्टॅन्ड कर्मचाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले की, येथील शौचालयासाठी पाण्याची कुठलीच सोय करण्यात आलेली नाही म्हणून आम्ही ते बंद ठेवलेले आहे. आम्ही नगरपालिकेकडे पाण्यासाठी बोअरची मागणी केली आहे, बोअरची सोय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्हाला शौचालय बंदच ठेवावे लागणार आहे. असंख्य महिला प्रवासी याबाबत तक्रार करीत असतात मात्र आमचा नाविलाज आहे असेही ते म्हणाले.

गावाबाहेरील एसटी डेपो बाबत माहिती देताना ते म्हणाले की, इतर गावातून दौंडला येणारी एकही गाडी आता डेपोला जात नाही. त्यामुळे सर्व प्रवासी एसटी पिकअप स्टॅन्ड वरूनच प्रवास करीत आहेत. डेपो मध्ये फक्त एसटी गाड्या दुरुस्तीचे काम आहे. डेपो मध्ये रोज 50 ते 55 कर्मचारी काम करीत असतात. तेथेही पाण्याची गैरसोयच आहे. इतर शहरातील डेपोमध्ये चालक आणि वाहकांसाठी रेस्ट रूम असते, दौंड डेपो मध्ये मात्र रेस्ट रूमच नाही अशी परिस्थिती आहे अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एका कर्मचाऱ्याने दिली.