पुणे (अब्बास शेख) : पुण्यातून फलटणकडे निघालेल्या तरुणीवर स्वारगेट येथे उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी सकाळी ५:३० च्या सुमारास घडली आहे. पुणे पोलिसांनी यातील आरोपीचे नाव निष्पन्न केले असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची आठ पथके रवाना झाली आहेत.
पुणे पोलिसांनी संशयीत आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याचा या घटनेत समावेश असल्याचे सांगितले आहे. या घटनेबाबत विस्तृत माहिती उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी देताना, या घटनेतील पीडित मुलगी पुण्यात काम करत असून ती फलटण या ठिकाणी तिच्या गावी निघाली होती. सकाळच्या सुमारास ती बसची वाट बघत असताना आरोपी गाडे हा तिच्याकडे गेला आणि तिच्याशी बोलू लागला. आरोपीने तिच्याशी गोड बोलून ओळख करुन घेतली आणि कुठे जाणार आहे आहे असे विचारून तिला फलटणला जायचे आहे ही माहिती तिच्याकडून काढून घेतली आणि फलटणकडे जाणारी बस इथे नाही तर दुसऱ्या ठिकाणी लागते असे म्हणून तिला शिवशाही बसजवळ घेऊन गेला. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्ही फुटेजमध्ये चित्रित झाला आहे.
स्मार्तना पाटील यांनी पुढील माहिती देताना, आरोपीने पीडित मुलीला बसमध्ये जायला लावले त्यावेळी त्या मुलीने या बसमध्ये अंधार आहे असे म्हटल्यानंतर आरोपीने ही बस रात्री आली आहे, लोक झोपले असतील असे म्हणून तुला हवं तर तू चेक कर असे सांगत तिला बसमध्ये जायला सांगितलं. यावेळी ही मुलगी आतमध्ये जाताच आरोपीने तिच्या मागोमाग बसमध्ये शिरून बसचा दरवाजा लॉक करत तिच्यावर बलात्कार केला असे सांगितले.
हे दुषकृत्या केल्यानंतर नराधम आरोपी बसमधून खाली उतरुन निघून जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. यानंतर ही पीडित मुलगी बसमधून खाली उतरली आणि तिने हा सर्व प्रकार तिच्या मित्राला सांगितला व दुसऱ्या बसने ती गावाकडे निघाली मात्र अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर तिच्या मित्राने तिला पोलीस स्टेशनला जायला सांगितले व त्यानंतर ती पोलीस ठाण्यात आली अशी माहिती त्यांनी दिली.
आरोपीला पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना –
नराधम आरोपी रामदास गाडे हा शिरुर तालुक्यातील असल्याची माहिती मिळत असून त्याची ओळख पटली असून त्याला शोधण्यासाठी आठ पथकं आणि डॉग स्क्वॉडही रवाना झाले असल्याची माहिती मिळत आहे.