दौंड मध्ये रेल्वे ड्रायव्हर, गार्ड व ट्रॅकमन यांच्या मागण्यांसाठी बेमुदत उपोषण आंदोलन सुरू

अख्तर काझी

दौंड : रेल्वे कर्मचारी वर्गाच्या ज्वलंत समस्यांवर रेल्वे प्रशासनाने दाखविलेल्या उदासीन भूमिके विरोधात रेल्वे कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने संपूर्ण भारतात उपोषण आंदोलन छेडण्यात आलेले आहे, त्या अनुषंगाने पुणे विभागातील रेल्वे चालक, गार्ड, ट्रॅकमन( मेन्टेनन्स) यांनी पिंटू रॉय ,मंजी कुमार सिंह विशाल भाटेकर , अनंत ढापसे यांच्या नेतृत्वाखाली दौंड रेल्वे स्टेशन परिसरात बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे.

लोको आणि ट्राफिक रनिंग स्टाफच्या प्रशासनाकडे अशा मागण्या आहेत की,NPS/UPS ला हटवून OPS ची पुनर्स्थापना करण्यात यावी, रनिंग भत्त्यामध्ये 25 टक्क्यांनी वाढ करावी,RAC 80 च्या फार्मूल्यानुसार रनिंग भत्त्यांच्या दरांसाठी संशोधन व्हावे,70% रनिंग भत्ता करमुक्त करावा, मालवाहतुकीसाठीच्या रनिंग स्टाफला आठ तासांची तर प्रवासी गाड्यांसाठी सहा तासांची ड्युटी लावावी, कर्मचाऱ्यांना सलग रात्रपाळी न देता दोन रात्रपाळ्यांसाठीच काम द्यावे, इंजिन चालकांना 36 तासाच्या दरम्यान त्यांच्या मुख्यालयाला आणण्यात यावे, महिला रनिंग स्टाफच्या विशेष समस्यांचे निवारण करावे, रनिंग स्टाफ आणि ट्रॅकमन ला प्रशासनाच्या मनमानी निर्माण विरोधात चार्जशीट देणे, निलंबन करणे बंद करावे.

तसेच याआधी दिलेले अवैध चार्जशीट रद्द करावे, ट्रॅकमनच्या कामाचा कालावधी आठ तासांचा निश्चित करावा. ट्रॅकमनला सायकल भत्ता लागू करावा, ट्रॅकमन कडून अधिकाऱ्यांच्या घरची कामे करून न घेता रेल्वे प्रशासनाच्या कामात त्यांचा उपयोग करून घ्यावा.

कर्मचाऱ्यांच्या मागण्या न्यायीक असून रेल्वे सुरक्षिततेच्या संबंधित आहेत मागण्या पूर्ण करणे आवश्यकच आहे. रेल्वे उत्पन्न वाढीबरोबरच कर्मचाऱ्यांच्या वेल्फेअरला सुद्धा महत्त्व देण्यासाठी, प्रशासन आणि कर्मचारी यांच्यातील औद्योगिक संबंध मजबूत करण्याचा प्रशासनाने प्रयत्न करावा अशी अपेक्षाही संघर्ष समितीच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.