दौंड (अख्तर काझी) : तालुक्यातील बोरीबेल येथील गाडेवाडी मध्ये राहणाऱ्या एका शेतकरी कुटुंबाच्या घरातून अज्ञात चोरट्याने जवळपास साडेदहा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी सुमन दादा जेडगे (वय 67,रा. गाडेवाडी, बोरीबेल, ता.दौंड) यांनी फिर्याद दिली. दौंड पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना दि. 15 जानेवारी रोजी सकाळी 10 च्या सुमारास घडली. फिर्यादी त्यांचे पती व घरातील सर्व सदस्य शेतीकामासाठी बाहेर गेले होते. दुपारी 12 च्या दरम्यान फिर्यादी व त्यांचे पती परत घरी आले असता त्यांना घराच्या दाराचा कडी,कोयंडा व कुलूप तुटलेले दिसले. घराचा दरवाजा उघडून पाहिला असता, घरातील सर्व कपाटे उघडे होती व त्यातील कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसले. हे सर्व पाहून फिर्यादी यांनी आरडाओरडा केला, आवाज ऐकून त्यांचा मुलगा शेतातून पळतच घरी आला.
त्यांनी मुलाला घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने आजूबाजूची लोकही त्या ठिकाणी आले. कपाटाची पाहणी केली असता चोरट्याने कपाटातील सोन्या चांदीचे दागिने किंमत 8 लाख 62 हजार रुपये व 1 लाख 75 हजार रुपयांची रोकड असा एकूण 10 लाख 37 हजार रुपयांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेल्याचे निदर्शनास आले. या घटनेचा दौंड पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.