दौंड : शहरात मावशीच्या मुलीच्या लग्नासाठी मुंबईहून आलेल्या नातलग महिलेच्या 62 हजार रु. किमतीच्या ऐवजावर चोरट्याने डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी शबनूर सुलतान कुरेशी (रा. कसाई वाडा, कुर्ला, मुंबई) यांनी फिर्याद दिली. दौंड पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना दि. 7 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान येथील खाटीक गल्ली येथे घडली. दि. 5 जानेवारी रोजी फिर्यादी यांच्या मावशीच्या मुलीचे लग्न असल्याने त्या दौंडला आलेल्या होत्या. दौंड येथील लग्न समारंभानंतर दि.7 जानेवारी रोजी याच लग्नाचे रिसेप्शन पुण्याला होते. त्यामुळे फिर्यादी सह सर्व नातेवाईक मावशीच्या घराला कुलूप लावून पुण्याला गेले. यावेळी फिर्यादी यांनी आपल्या सामानाची बॅग घरातच ठेवलेली होती. बॅगेमध्ये सोन्याचे दागिने व भावाचे किमती घड्याळ होते.
पुण्यातील कार्यक्रम उरकून सर्व मंडळी दि. 8 जानेवारी रोजी दौंडला आले. घरात प्रवेश करताच त्यांना घरात ठेवलेल्या बॅग मधील सामान व कपाटातील कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसले. फिर्यादी यांच्या कुलूप बंद बॅग मधील सोन्याचा ऐवज व किमती घड्याळ असा 62 हजार रुपयांचा ऐवजी गायब झालेला दिसला. त्यांनी घरात व परिसरात या वस्तूंचा शोध घेतला परंतु त्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे त्यांची खात्री झाली की कोणीतरी अज्ञात इसमाने इमारतीच्या टेरेसवरून घरात प्रवेश करीत त्यांच्या किमती ऐवजाची चोरी केली. याबाबत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास दौंड पोलीस करत आहेत.