संविधान प्रतिकृती तोडफोड प्रकरणी दौंडमध्ये दलित संघटनांचे निषेध आंदोलन

अख्तर काझी

दौंड : संविधान दिनानिमित्त परभणी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर संविधानाची प्रतिकृती बनविण्यात आली होती मात्र अज्ञात समाजकंटकाने त्या प्रतिकृती ची तोडफोड करीत आंबेडकरांच्या स्मारकावर दगडफेक करण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेविरोधात दौंड येथील दलित संघटनांच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा चौकातील संविधान स्तंभ येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी दलित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून या घटनेचा व सरकारचा निषेध नोंदविला. संबंधित समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व परभणी येथील आंबेडकरी जनतेवरील सुरू असलेले अन्याय, अत्याचार थांबवावे अशी मागणी यावेळी समस्त आंबेडकरी जनतेच्या वतीने करण्यात आली.

यावेळी आंदोलकांनी आपले मत व्यक्त करताना, महामानव, विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय समाजातील प्रत्येक व्यक्तीची अस्मिता आहे. त्यांच्याबाबत जर कोणी वादग्रस्त विधान किंवा वाईट कृत्य करत असेल तर ते निषेधार्थ आहे. ज्या बाबासाहेबांनी संविधान लिहिले त्या संविधानाच्या प्रतिकृतीची परभणी येथे समाजकंटकाने तोडफोड केली आहे तसेच बाबासाहेबांच्या स्मारकावरही दगडफेक केली आहे. सदरची घटना जाणीवपूर्वक व जातीय द्वेष भावनेतून करण्यात आली असून या घटनेचा दौंड शहर व तालुक्यातील समस्त आंबेडकरी जनतेच्या वतीने निषेध करण्यात येत असल्याचे सांगितले.

संबंधित घटनेतील समाजकंटक आरोपी व घटनेचा मुख्य सूत्रधार यांचा शोध घेऊन त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून कडक शासन करण्यात यावे, तसेच राज्य सरकारने कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली समाजातील महिला व युवकांना मारहाण करून खोटे गुन्हे दाखल करणे तत्काळ थांबवावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी दलित संघटनांचे पदाधिकारी तसेच भीमसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.