पाटस (दौंड) : दौंड तालुक्यातील कडेठाण येथे शेतात काम करणाऱ्या शेतकरी महिलेवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार मारल्याची भयंकर घटना आज दुपारी उघडकीस आली आहे. लताबाई बबन धावडे (रा. कडेठाण. ता.दौंड. जि.पुणे) असे या महिलेचे नाव आहे.
ही घटना आज दि. 7 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली असून यामुळे संपूर्ण दौंड तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. लताबाई धावडे या शेतामध्ये काम करत असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर झडप मारून त्यांना सुमारे एक हजार फुटापर्यंत शेतामध्ये ओढत घेऊन गेल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये दौंड तालुक्यात बिबट्याकडून माणसांवर होणाऱ्या हल्ल्यामध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. वनविभागाने वेळीच या ठिकाणी पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद केले नाही तर बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.