दौंड : विधानसभा निवडणुकीत दौंडचे आमदार राहुल कुल हे तिसऱ्यांदा निवडून यावेत म्हणून केडगावच्या शेंडगे वस्ती येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे तरुण मंडळाच्या युवकांनी वस्तीजवळ बांधण्यात आलेल्या मांढरदेवी काळुबाईला नवस केला होता. आमदार राहुल कुल हे तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर केलेला नवसाची पूर्तता करण्यासाठी सौ. कांचनताई कुल यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात येऊन येथील गावकऱ्यांना जेवण देण्यात आले.

केडगाव गावठाण शेंडगे वस्ती या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तरुण मंडळातील माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक शेंडगे,भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जमाती आघाडी उपाध्यक्ष पंढरीनाथ शेंडगे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मंडळाचे अध्यक्ष अशोक नामदेव शेंडगे व प्राथमिक शाळा केडगाव गावठाण शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मल्हारी शेंडगे यांनी निवडणुकीवेळी राहुल कुल हे तिसऱ्यांदा आमदार व्हावेत यासाठी हा नवस केला होता.
नवसाची पूर्तता करण्यासाठी आमदार राहुल कुल यांच्या पत्नी सौ. कांचनताई कुल यांच्या उपस्थितीमध्ये नवसाचा कार्यक्रम पूर्ण करण्यात आला. तसेच त्या निमित्ताने मांढरदेवी चरणी राहुल कुल यांची मंत्रिपदी वर्णी लागावी यासाठी सौ. कांचनताई कुल यांच्या उपस्थितीमध्ये महाआरती करण्यात आली. यावेळी केडगाव परिसरातील सर्व पदाधिकारी ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.