दौंड (अख्तर काझी) : शहरात अमृत महोत्सवी (75) संविधान दिन (26 नोव्हेंबर) मोठया जल्लोषात साजरा करण्यात आला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) व सम्यक संविधान ग्लोबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्हाध्यक्ष सचिन खरात यांच्या पुढाकाराने संविधान सन्मान सोहळा व सामाजिक उपक्रमांचे (अन्नदान, लाडू वाटप) आयोजन यावेळी करण्यात आले. चिमुकली भिमकन्या आदिती संसारे हिने संविधानाची प्रस्तावना वाचून संविधान सोहळा कार्यक्रमाची सुरुवात केली.
यावेळी समाजातील मान्यवरांना संविधान रक्षक, रिपब्लिकन योद्धा ,समाज रत्न ,माता रमाई अशा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संविधान सन्मान सोहळा कार्यक्रमाचे मुख्य वक्ते मराठी मुस्लिम चळवळीचे प्रणेते, दंगा मुक्त महाराष्ट्र अभियानाचे अध्यक्ष सुभान अली शेख यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाचे महत्त्व व गरज याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. माजी शिक्षणाधिकारी बी. वाय. जगताप, डॉ. भीमराव मोरे, आबा वाघमारे, गणेश घुगे, माहिती अधिकार कार्यकर्ता जयदीप बगाडे आदींनी सध्याच्या युवा पिढीला देशाच्या संविधानाविषयी मोलाची माहिती दिली.
सिद्धांत म्युझिकल नाईट चे गायक राजू भालसेन व गायक सचिन पाटोळे यांनी आपल्या पहाडी व मधुर आवाजात भीम गीते सादर केली. याप्रसंगी पक्षाच्या महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या उपाध्यक्षा प्रियदर्शनी निकाळजे, शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन रवी पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.