दौंड : दौंड तालुक्यात सध्या सोशल मीडियावरील हुरडफुके लेखणी बहाद्दर उराला वाळू लावून आपल्या नेत्या प्रति निष्ठा दाखवण्यासाठी जीवाचे रान करताना दिसत आहेत. वेळ पडली तर समोरील उमेदवाराबाबत आरे तुरे ची भाषा सुद्धा वापरताना ते दिसत आहेत. ज्यांच्यावर चांगले संस्कार झालेले असतात ते शक्यतो भाषेची मर्यादा कधी ओलांडत नाहित मात्र ज्यांनी कायम दुसऱ्यांना नावे ठेवून, बदनामी आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना याचे सोयरे सुतक नसते.
गेल्या दोन दिवसांत असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. एका बहाद्दराने म्हसोबाच्या यात्रेलाच राजकीय रंग देऊन त्यावर खालच्या भाषेत लिखाण केले. या यात्रेवरील टिकेमुळे धनगर समाजाचे नेते दादा केसकर हे संतप्त झाले आणि आमचा समाज यावर नक्कीच तुम्हाला योग्य ते उत्तर देईल असे सांगितले. मग काय चाटूगिरी करणाऱ्या त्या लिखाण बहाद्दराला त्यांच्या नेत्यांची फटकार बसली अण तुझ्यामुळे माझी मत कमी करतो का असा दम आल्यानंतर इकडे आड, तिकडे विहीर असा प्रकार झालेल्याने पुन्हा आपले डोके लढवले.
या बहाद्दराने केसकर यांना फोन करून अगोदर पत्रकारितेचा आव आणत दमात घेण्याचा प्रयत्न केला मात्र ते जुमानत नसल्याचे दिसताच मी बातमी छापणार आहे असे बोलून फोन ठेऊन दिला. दुसऱ्या दिवशी या लेखणी बहाद्दरने देवदेवतांच्या जत्रेवरील टिकेला राजकीय जेवणावळीचे स्वरूप देऊन मी किती मोठा आणि जेष्ठ आहे याचा स्वतःच्या लिखाणातूनच केसकरांच्या नाव छापून उदो उदो करून घेतला. विशेष म्हणजे हे सर्व करताना त्याने केसकर यांच्या नावाने समोरील व्यक्ती खोटी आणि आपण बातमी छापून, त्यात म्हसोबा यात्रेची बदनामी करून आपणच खरे असा भासवण्याचा प्रयत्न केला.
मात्र ज्यावेळी याबाबत केसकर यांना विचारले असता मी असे काही बोललोच नाही. त्याने सर्व मनाने छापल्याचे सांगितले व आमच्या देव देवतांच्या यात्रावर करण्यात येणारी टिका टिप्पणी यापुढे सहन केली जाणार नाही, मी जे काल मीडियासमोर येऊन व्हिडीओ द्वारे विधान केले आहे त्यावर आजही ठाम असल्याचे सांगितले.
केसकर यांच्या नावाने हुरडफुक्याने जे काही छापले ते त्यांच्या मनाचे श्लोक होते हेही यावरून स्पष्ट झाले आहे. तुमचे राजकारण तिकडे चुलीत घाला मात्र म्हसोबा देवाचे नाव घेऊन राजकारण का करता. राजकारणात कोण कोणत्या जाती धर्माचे हे कुणी पाहत नाही मात्र तुमच्या स्वार्थी राजकारणात म्हसोबा देवाचे नाव बदनाम करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला असाही प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. त्यामुळे जे काही छापून आले ते स्वतःला लेखणी बहाद्दर समजणाऱ्याने स्वतःच्या डोक्यातून सुचलेल्या सुपीक कल्पनेतून लिहून ते छापले असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे यापुढे स्वतःच्या नेत्याची चाटुकारिता करताना दुसऱ्यांच्या धार्मिक भावनांना हात घालू नये आणि घातला तर अपमानाचा मानकरी व्हावे लागेल हेही आता त्यांच्या लक्षात आले आहे.