Big News | दौंड शहरातील ‘आयशा मस्जिद ट्रस्ट’ चा आमदार ‘राहुल कुल’ यांना पाठिंबा

दौंड (अख्तर काझी) : शहरात महायुतीचे उमेदवार आमदार राहुल कुल यांनी प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. येथील विविध समाज, संघटनांचा मोठा पाठिंबा त्यांना मिळत आहे. शहरात दलित, मुस्लिम, ख्रिश्चन समाजातील मतदारांची संख्या मोठी असून या तिन्ही समाजाचे मतदान निर्णायक ठरणार असल्याने या समाजाची मते आपल्यालाच मिळावीत यासाठी महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून मोठे प्रयत्न होताना दिसत आहे. आज शहरातील ख्वाजा वस्ती परिसरातील आयशा मस्जिद ट्रस्टने आमदार राहुल कुल यांना आमंत्रित करून एकमताने पाठिंब्याचे पत्र दिले आहे.

कोणाचीही जात-पात न पाहता आमदार राहुल कुल यांचे आरोग्य सेवेचे काम कौतुकास्पद आहे. कुल यांनी कोरोना सारख्या महामारी मध्ये मुस्लिम समाजाला खंबीरपणे साथ दिली. राहुल कुल हे रमजान ईद या मोठ्या सणाला दरवर्षी परिसरातील समाज बांधवांना अतिशय अल्पदरात दूध उपलब्ध करून देत असतात. मुस्लिम समाज बांधवांच्या कोणत्याही संकट समयी ते कुटुंबातील सदस्याप्रमाणे धावून येतात. या त्यांच्या सर्व उपकारांची जाणीव ठेवून तसेच सर्वच बाबींचा विचार करून येथील समस्त मुस्लिम समाजाने विधानसभा निवडणुकीत एकमताने राहुल कुल यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतलेला आहे असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, ज्येष्ठ नगरसेवक नंदू पवार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे निखिल स्वामी, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अमित सोनवणे, भीम वॉरियर्स संघटनेचे प्रमोद राणेरजपूत, सागर उबाळे, अमोल काळे, अकबर सय्यद तसेच आयशा मस्जिद ट्रस्टचे इस्माईल शेख, रियाज सय्यद, मोईन बावजकर, जहिद शेख ,रफीक शेख, तुफेल मण्यार ,सलीम लाला शेख, जावेद शेख, इब्राहिम शेख व समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

अण अचानक एक चिमुकला राहुल कुल यांच्याकडे धावत आला.. आयशा मशिदीचा कार्यक्रम संपत असतानाच एक लहान मुलगा आमदार राहुल कुल यांच्याकडे आला व म्हणाला की, माझ्या आजोबाने तुम्हाला भेटायला बोलाविले आहे, त्यांच्या पायावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे त्यामुळे तुम्हाला घरी घेऊन जाण्यासाठी मी आलो आहे. हे ऐकून सारेच थक्क झाले. आमदार कुल सहित सर्वांनीच त्याच्याबरोबर घरी जाण्याचा निर्णय घेतला. घरी जाऊन पाहतो तर काय त्याचे आजोबा म्हणजे शहरातील काचेच्या बांगडीचे प्रसिद्ध व्यापारी इकबाल भाई मन्यार निघाले.

इकबाल मन्यार यांना दोन्ही गुडघ्याचे दुखणे होते. त्यांना चालताना मोठ्या वेदना होत होत्या. शस्त्रक्रिये शिवाय पर्याय नव्हता, नेहमीप्रमाणे शस्त्रक्रियेचा खर्च न पेलावणाराच होता. त्यामुळे मण्यार कुटुंबीयांनी प्रेमसुख कटारिया व राहुल कुल यांची भेट घेत शस्त्रक्रियेसाठी मदत करण्याची विनंती केली. क्षणाचाही विलंब न लावता राहुल कुल यांनी मण्यार यांना मदत करण्याचा शब्द दिला. कुल यांनी पुण्यातील संचेती हॉस्पिटलशी संपर्क करून मण्यार यांच्या गुडघ्यावरील शस्त्रक्रियेसाठी प्रयत्न सुरू केले आणि काही दिवसातच संचेती हॉस्पिटलमध्ये मण्यार यांच्या गुडघ्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली.

शस्त्रक्रियेनंतर मण्यार यांना विश्रांतीसाठी घरी पाठविण्यात आले आहे. राहुल कुल यांच्यामुळे हे सर्व शक्य झाल्याने मन्यार कुटुंबियांनी आज राहुल कुल यांना घरी बोलावून त्यांचे आभार मानले. यावेळी संपूर्ण मण्यार कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मित हास्य दिसत होते.