दौंड (अख्तर काझी) : मुस्लिम धर्मगुरू मौलाना सज्जाद नोमानी (लखनऊ) यांनी नुकतीच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतली आहे. यावेळी जरांगे म्हणाले आहेत की, आता आमचे समीकरण जुळले आहे. 4 नोव्हेंबर पासून आमचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी दौंड विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मा. नगराध्यक्ष बादशहा शेख यांना पाठिंबा देऊन येथील समाजाला शेख यांना मतदान करण्याचे आवाहन करावे अशी अपेक्षा येथील मुस्लिम समाजाच्या युवा वर्गाकडून होत आहे.
तालुका व शहरातील मुस्लिम युवकांचे मित्र, जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक राजाभाऊ कदम यांनी या कामी बादशाह शेख यांना मदत करावी अशी अपेक्षाही मुस्लिम युवकांकडून कदम यांच्याकडे व्यक्त करण्यात येत आहे. सलग तीस ते पस्तीस वर्ष नगरसेवक असलेल्या माजी नगराध्यक्ष बादशहा शेख यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना पक्षाच्या वतीने एबी फॉर्म देऊन उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. वंचित ने साथ देण्याचे ठरविल्याने आता कोणत्याही परिस्थितीमध्ये बादशहा शेख आपली उमेदवारी माघारी घेणार नाहीत असेही त्यांचे कार्यकर्ते छाती ठोक पणे सांगत आहेत.
दौंड विधानसभेसाठी भाजपा मित्रपक्ष (महायुती) कडून विद्यमान आमदार राहुल कुल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर महायुतीचाच मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय, दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे सुद्धा पक्षाचा एबी फॉर्म घेऊन रिंगणात उतरले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून मोठ्या प्रयत्नातून तुतारी मिळवीत माजी आमदार रमेश थोरात यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. या तिन्ही मराठा उमेदवारांसाठी किंवा त्यांच्या नातलगांसाठी बादशहा शेख यांनी आपल्या समाजाकडे व इतरही समाजाकडे मतांचा जोगवा मागितला आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.
त्यामुळे यावेळेस या तिघांनी बादशाह शेख यांच्यासाठी काहीतरी करण्याची हीच वेळ आहे, त्यांनी मदत केली पाहिजे अशी अपेक्षा समाजाच्या युवा वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. तीन मराठा उमेदवार एकमेकाच्या विरोधात रिंगणात असल्याने त्याचा फायदा बादशाह शेख यांना होऊ शकतो आणि जर जरांगे पाटील यांनी शेख यांना पाठिंबा देऊन त्यांनी जर एक सभा दौंडला घेतली तर काहीतरी चमत्कार होऊ शकतो असेही शेख यांच्या समर्थकांना वाटत आहे.
मुस्लिम समाज तसेच शहरातील सर्वच समाजाच्या प्रत्येक चांगल्या-वाईट प्रसंगामध्ये बादशाह शेख सदैव सहभागी असतात त्यामुळे दौंडकरांनी सुद्धा बादशहा शेख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन युवा वर्गाने केले आहे. दौंडकरांना अनेक राजकीय धक्के देणारी यंदाची विधानसभा निवडणूक खूपच रंगतदार होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.