आ.राहुल कुल यांच्या रूपाने दौंड तालुक्यात भाजपला सुवर्ण काळ

अब्बास शेख

दौंड : दौंड तालुक्यामध्ये भाजप आपला पाया इतका भक्कम रोवेल असे दहा वर्षांपूर्वी कुणालाही वाटत नव्हते. कारण दौंड तालुका हा जेष्ठ नेते शरद पवारांचा अभेद्य किल्ला मानला जातो. या ठिकाणी अनेक पक्षांनी विविध प्रयोग करून पाहिले मात्र कुणालाच पवारांच्या विरोधात जम बसवता आला नाही. याला अपवाद फक्त आ.राहुल कुल राहिले आहेत. आमदार राहुल कुल यांनी 2014 साली राष्ट्रवादीशी फारकत घेऊन रासप, भाजप, शिवसेना युतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या ठिकाणी महायुतीच्या आ.राहुल कुल यांनी बाजी मारली अण भाजपला खऱ्या अर्थाने या तालुक्यात पाय रोवायला जागा मिळाली.

दौंड तालुक्यात या अगोदर भाजप च्या अनेक नव्या, जुन्या नेत्यांनी आपले नशीब आजमावले मात्र त्यांना येथे मोठी मजल कधीच मारता आली नाही. अनेक भाजप नेत्यांना येथे दारुण पराभवालाही सामोरे जावे लागले. मात्र आ.राहुल कुल हे महायुतीमध्ये आले अण दौंड तालुक्यात भाजपचा सुवर्ण काळ सुरु झाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 2014 रासप,भाजप,शिवसेना महायुती आणि 2019 साली आ.राहुल कुल यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत विजयश्री खेचून आणली. आ.कुल यांचे हजारो कार्यकर्ते भाजपला जोडले गेले त्यामुळे आपसूकच भाजपची ताकद ही दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाढत गेली तर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मात्र येथे कमी कमी होत गेली आहे. ‘पवारांच्या बालेकिल्ल्यात भाजपची इंट्री’ याची मोठी चर्चा दिल्लीपर्यंत होत राहिली आहे.

त्यामुळे यावेळी आ. कुल यांना शह देण्यासाठी वेगवेगळे हातखंडे वापरले जात असल्याचे दिसत आहे. आमदार कुल यांना रोखण्यासाठी माजी आमदार रमेश थोरात हे अपक्षउमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याच्या तयारीत असून माजी सभापती आप्पासो पवार, नामदेव ताकवणे हे शरद पवार यांच्या गटाकडून आमदारकी साठी उमेदवारीची मागणी करू शकतात असे एकंदरीत दिसत आहे.

आ.कुल यांनी सामान्यांची केलेली कामे, त्यांचे आरोग्य विषयक प्रश्नांबाबत असलेले ज्ञान आणि लोकांना त्यातून होणारी मोठी मदत ही कुल यांची मोठी जमेची बाजू आहे. त्यांनी मांडलेली खडकवासला भुयारी बोगद्याची संकल्पना ही आता प्रत्यक्षात उतरत असून याचा मोठा फायदा शहरी भागातील दळणवळणाला आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना होणार आहे.

मंत्रालयाचा दांडगा अनुभव, मंत्री आणि अधिकाऱ्यांकडून सर्वसामान्यांची कामे मार्गी लावून देण्याची पद्धत आणि तालुका आणि जिल्ह्याच्या मूलभूत अडचणींवर मात करण्यासाठी त्यांची सुरु असलेली धडपड ही दौंड तालुक्यातील भाजप वाढीसाठी मोठी जमेची बाजू समजली जात आहे. त्यामुळे आमदार राहुल कुल यांच्यामुळे आता दौंड तालुक्यात भाजप भक्कमपणे पाय रोवून उभा आहे हे कोणीही नाकारू शकत नाही.