खम्मम : चित्रपटांमध्ये अभिनय करणारे हिरो आपण रोज पाहतो पण हे हिरो आपल्याला प्रत्यक्ष जीवनात रोजच पाहायला मिळतात असे नाही. अंगावर गणवेश नसताना, कोणतीही शासकीय पदवी नसताना असे काही लोक असतात जे कोणत्याही गणवेशाविना इतरांसाठी असे काही करतात कि ज्यामुळे आजही माणुसकी जिवंत आहे याचा प्रत्यय येतो.
नेमकं काय घडलं… तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे अनेक लोक घरात अडकून पडले आहेत. राज्य सरकारांकडून मदत आणि बचाव कार्याला वेग आला आहे मात्र अनेकठिकाणी बचावपथक, हेलिकॉप्टर पोहचत नाहीयेत. खम्मम जिल्ह्यात असेच घडले. तेलंगणातील खम्मम जिल्ह्यात एका नदीपात्रात गाडीसह नऊ जण अडकले होते. त्यांनी कसातरी मदतीचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. खराब हवामानामुळे अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी सरकारी हेलिकॉप्टर तेथे पोहोचू शकले नाही. दरम्यान, हरियाणातील ‘सुभान खान’ या जेसीबी चालकाने अडकलेल्या लोकांचा व्हिडिओ पाहिला. व्हिडिओ पाहून तो लोकांना वाचवण्यासाठी जेसीबी घेऊन निघाला.
‘एकतर ती मरेल, नाहीतर 9 जणांचा जीव वाचेल’
सुभान खान जेसीबी घेऊन निघाला मात्र मार्ग सोपा नव्हता म्हणून त्याने कुटुंबीयांना सांगितले, ‘एकतर मी मरेन किंवा नऊ लोकांचे प्राण वाचतील. मी मेले तर एक आयुष्य संपेल, पण मी परत आलो तर माझ्यासोबत नऊ लोक परत येतील…’ असे म्हणून तो नदीपात्रात उतरला. असं म्हणतात की जर तुम्ही एखाद्या गोष्टीवर खऱ्या मनाने प्रेम करत असाल तर ती तुमच्यासोबतच राहते आणि सुभानचा हेतू माणुसकीने भरलेला होता. तो नदी पात्रात त्या नऊ जणांना वाचविण्यासाठी उतरला मात्र पाण्याचा वेग इतका भयंकर होता कि तो जेसीबी सह वाहून जातो कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र अथक प्रयत्न करून सुभान खान ने जेसीबी च्या सहाय्याने अखेर त्या नऊजणांचे प्राण वाचवले. लोकांनी बचावकार्य करताना त्याचा व्हिडीओ बनवून व्हायरल केला आहे. हा व्हिडीओ पाहून अंगावर शहारे येतात.
बीआरएस नेत्याकडून स्तुती, सत्कार
सुभान खान याच्या शौर्याची आणि मोठ्या मनाची सर्वत्र चर्चा होत आहे. बीआरएस नेते आणि माजी मंत्री के.टी. रामाराव म्हणाले की, ही केवळ धैर्याची बाब नाही. खरा हिरो बनण्यासाठी तुम्हालाही मोठ्या मनाची गरज असते. नऊ लोकांना मदत करून सुभान खान यांनी नऊ कुटुंबांना आयुष्यभराच्या दुःखातून वाचवले आहे. खराब हवामान असल्याने बचावासाठी हेलिकॉप्टर पाठवायचे की नाही या संभ्रमात असताना सुभानने स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्वांचे प्राण वाचवले हे खूप महान कार्य आहे असे ते म्हणाले.