अख्तर काझी
दौंड : राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते उघडून त्या खात्याचा स्वतःच्या फायद्यासाठी गैरवापर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेतील खातेदाराने सदरचा प्रकार केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. बँकेचे व्यवस्थापक विपुल अजय जैन यांच्या फिर्यादीवरून अनिता श्यालमोन गुंजी(रा. गोवा गल्ली, दौंड) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे खातेदार अनिता गुंजी यांनी बँकेने दिलेल्या अटी व शर्तीचे उल्लंघन करून सदरच्या खात्याचा वापर त्यांनी बँकेत नमूद केलेल्या उद्योगाच्या व्यवहारासाठी न करता स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता, इतर व्यवहारासाठी( ऑनलाइन गेमिंग) करून बँकेची फसवणूक केली आहे. दौंड पोलिसांनी महिला खातेदारा विरोधात भा. द. वि. कलम 420 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष डोके करीत आहेत.
दौंड शहरात ऑनलाइन गेमिंग चा धंदा जोमात सुरू असून त्या साठी बँकांमधील खात्यांचा गैरवापर होत असल्याची मोठी चर्चा शहरात चर्चिली जात होती. खबर पोलिसांपर्यंत पोहोचल्याने दौंड पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या(पुणे ग्रा.) पोलीस पथकाने सदरचा विषय गांभीर्याने घेऊन तपास सुरू केला होता. या बँकेतील संशयास्पद खातेदारांची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत होती, त्या खातेदारांपैकी एका खातेदारावर गुन्हा दाखल झाल्याने शहरात ऑनलाइन गेमिंग साठी व इतर व्यवहारांसाठी बँकेच्या खात्याचा गैरवापर केला जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.
शहरात अशा व्यवहारांची व खातेदारांची व्याप्ती मोठी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे अशा प्रकरणात आणखी कोणा कोणा खातेदाराचा नंबर लागतो हे पोलिसांच्या तपासात लवकरच उघड होणार आहे. बँक खात्याचा ऑनलाइन गेमिंग साठी वापर केल्याने महिला खातेदारावर गुन्हा दाखल झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.