दौंड मध्ये नगरपालिकेचे फिश मार्केट धूळखात पडून, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

अख्तर काझी

दौंड : दौंड नगरपालिकेने राज्य शासनाकडून मिळालेल्या तब्बल 1 कोटी रुपये निधीतून शहरातील भाजी मंडई परिसरात फिश मार्केटची (म्युनिसिपल मार्केट) इमारत उभारली आहे. मात्र मागील 5-6 वर्षापासून सदरची इमारत विना वापर अक्षरशः धुळखात पडली असल्याचे चित्र समोर येत आहे. शासनाचे एक कोटी रुपये पाण्यात जात असल्याचे पाहून सदरचे फिश मार्केट त्वरित सुरू करण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

पुढील लिंकवर जाऊन आमचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा – https://youtube.com/@sahkarnama?si=KeciMDWat9jhC-83

दौंड नगरपालिका हद्दीतील सिटी सर्वे नंबर 303 पै. या जागेत जून 2018 मध्ये सदरच्या फिश मार्केटचे काम पूर्ण झालेले आहे. काम पूर्ण होऊन पाच ते सहा वर्ष झाली असून सदर इमारतीचा वापर न झाल्याने नगरपालिकेचा महसूल बुडत आहे. इमारतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ही इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

या सर्व प्रकारामुळे नगरपालिकेचे लाखो रुपयांचे उत्पन्नही बुडत आहे. इमारत बांधकाम पूर्ण होऊन देखील सदर इमारतीतील गाळ्यांचा लिलाव न करता ती धुळखात पडू देणे, यास जे कोणी जबाबदार असतील त्यांची कायदेशीर चौकशी करावी व नगरपालिकेचे जे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे ते संबंधितांकडून वसूल करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलेली आहे.