जातीवाचक शिवीगाळ करून फायटरने डोळ्यावर गंभीर मारहाण, पारगाव येथील भयंकर घटना

पारगाव (दौंड) : दौंड तालुक्यातील पारगाव (सालू मालू) येथे किरकोळ वादातून एकाला जातीवाचक शिवीगाळ करून त्याच्या डोळ्यावर फायटर शस्त्राने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याबाबत यवत पोलिसांनी 1) गौरव राजेंद्र ताकवणे 2) अनिकेत खंडेराव ताकवणे 3) रमेश श्रीराम झांझुर्णे  4) आदेश सतिश ताकवणे (सर्व रा. पारगाव ता.दौंड.जि.पुणे) यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी आणि मारहानीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत किशोर महादेव सोनवणे (वय 32 वर्षे व्यवसाय ड्रायव्हर, रा. पारगाव तळवाडी ता.दौंड.जि.पुणे) यांनी फिर्याद दिली असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि.12 जुलै रोजी सांयकाळी 6ः30 च्या सुमारास पारगाव हद्दीत असणाऱ्या तळवाडी येथे फिर्यादी यांच्या नात्यातील महिलेसोबत आरोपी क्रमांक 1 हा दररोज बोलत असल्याच्या कारणावरून साक्षीदार व आरोपी यांच्यात शाब्दीक बाचाबाची होवुन वाद चालु होता.

त्यावेळी तो वाद मिटविण्यासाठी फिर्यादी यांनी मध्यस्थी केली असता आरोपी गौरव राजेंद्र ताकवणे याने फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ करत दमदाटी केली आणि धमकी देऊन हातातील लोखंडी फायटरने फिर्यादीच्या डाव्या डोळ्यावर मारहाण करून दुखापत केली तर  इतर आरोपींनीही फिर्यादीस लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

या घटनेचा तपास आण्णासाहेब घोलप (उपविभागीय पोलिस अधिकारी, दौंड विभाग, दौंड) हे करीत आहेत.