अब्बास शेख
दौंड : दौंड तालुक्यात सध्या घरांवरून उडणारे ड्रोन आणि होणाऱ्या चोऱ्या यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना आता एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी पोलिस हवालदाराच्या मानेवर कोयता आणि त्यांच्या गर्भवती मुलीच्या गळ्यावर तलवार ठेवून लाखोचा ऐवज लुटून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. थेट पोलिस हवालदाराला भर रस्त्यात अडवून लूटमार करण्यात आल्याने दौंड तालुक्यात खळबळ माजली आहे.
(आम्ही या घटनेतील पोलिस हवालदार आणि त्यांच्या कुटुंबियांचे नाव हे गोपनीय ठेवले आहे, कारण त्यांच्या गर्भवती मुलीचे नाव बातमीत येणे हे आमच्या नैतिकतेमध्ये बसत नसल्याने आम्ही सर्व नावे गोपनीय ठेवली असून, आमचे वाचक आम्हाला समजून घेतील असा विश्वास आहे) मिळालेल्या माहितीनुसार बंडगार्डन येथे पोलिस हवालदार म्हणून कार्यरत असणारे हे अधिकारी आपली पत्नी, आपली गरोदर मुलगी या आपल्या कुटुंबियांसह पुणे सोलापूर महामार्गावरून जात होते. पहाटेच्यावेळी त्यांनी स्वामी चिंचोली येथील वनवे पेट्रोल पंपाजवळ असणाऱ्या पुलावर लघुशंकेसाठी गाडी थांबवली असता त्या ठिकाणी चार अज्ञात चोरटे आले. या चोरट्यांच्या हातामध्ये त्यांच्या हातामध्ये कोयता, खंजर व तलवार अशी घातक शस्त्रे होती.
त्यांनी पोलिस हवालदार आणि त्यांच्या कुटुंबियांना हत्यांराचा धाक दाखवत त्यांच्या गर्भवती मुलीच्या गळ्याला तलवार आणि पोलिस हवालदाराच्या गळ्याला लाकडी मुठ असलेला काळ्या रंगाचा लोखंडी कोयता लावुन त्यांच्याकडील 35 हजार रोख रक्कम आणि त्यांच्या मुलीच्या गळ्यातील मनी मंगळसुत्र, कानातील झुमके तसेच पोलिस हवालदार यांच्या माझ्या पत्नीच्या गळ्यातील काळे मणी असलेला सोन्याचा पॅन्डल आणि एक डोर्ले असे एकुण अडीज तोळे वजनाचे सोने अंदाजे 70 हजार रुपये किंमतीचे दागिने आणि पैसे असा 1 लाख 4 हजार 100 रुपयांचा ऐवज चोरी केला.
यावेळी हवालदार आणि त्यांच्या पत्नीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, तुमच्या जवळचे दागिने आणि पैसे गुपचुप काढून द्या नाही तर तुमच्या गरोदर मुलीला आम्ही मारुन टाकु असे म्हणत या चोरट्यांनी या हवालदार आणि त्यांच्या कुटुंबियांचा 1 लाख 4 हजार 100 रुपयांचा ऐवज चोरी करून फरार झाले. या घटनेचा अधिक तपास दौंडचे सपोनि गटकूळ हे करीत आहेत.