लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौंड पोलिसांचे शहरातून संचलन

दौंड : सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. प्रमुख पक्षांकडून आपल्या उमेदवाराचा प्रचार सुरू करण्यात आला आहे. अशावेळी शहरात कायदा सुव्यवस्था रहावी या उद्देशाने दौंड पोलिसांनी है तयार हम.. हे दाखविण्यासाठी शहरातून संचलन केले.

संचलनामध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या 2 अधिकाऱ्यांसह 55 जवान तसेच दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष डोके,3 अधिकारी व 25 पोलीस कर्मचारी 4 सरकारी वाहनांसह सहभागी होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, खाटीक गल्ली, महात्मा गांधी चौक, अलमगीर मशीद, कुंभार गल्ली, नेहरू चौक ते संत गाडगेबाबा चौक (संविधान चौक) या मार्गावर पोलिसांकडून संचलन करण्यात आले.

लोकसभा निवडणुकीसाठी बारामती मतदारसंघांमध्ये प्रमुख पक्षांचे उमेदवार निश्चित झाले आहेत, कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवाराचा प्रचार सुरू केलेला आहे. अशा वातावरणात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहर व तालुक्यातील कायदा सुव्यवस्था राखण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर आहे.

हे आव्हान पेलण्यासाठी आम्ही कसे सज्ज आहोत याचे प्रात्यक्षिक आज पोलीस प्रशासनाकडून दाखविण्यात आले. दौंड शहरात प्रवेश करण्यासाठी असणाऱ्या संत मदर तेरेसा( नगर मोरी) चौकामध्ये तात्पुरती पोलीस चौकी उभारण्यात आली आहे, या चौकामध्ये आत्तापासूनच वाहनांची तपासणी करण्याचे काम दौंड पोलीस स्टेशनच्या वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी करीत आहेत.