अब्बास शेख
लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतसे इच्छुक उमेदवारांकडून वेगवेगळे राजकीय डावपेच टाकले जाऊ लागले आहेत. बारामती लोकसभा मतदार संघात सध्या राजकीय डावपेचांनी तर सर्वोच्च पातळी गाठली आहे. पुतण्याने काकाविरुद्ध बंड केले आणि काकाच्या हक्काच्या जागेवर आपला हक्क सांगितला त्यामुळे आता काकानेही आपल्या पुतण्याचे पुतणेच फोडून आपल्या पुतण्याला नमोहरम करण्यास सुरुवात केली आहे.
शह.. काट शह राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बारामतीचे आमदार अजित पवार यांनी शरद पवार यांना डावलून भाजप सोबत सरकार स्थापन करताच माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांनी आपले पुतणे अजित पवार यांना शह देण्याची रणनीती आखली. हे होत असताना अजित पवार यांनीही मग थेट बारामती लोकसभेला हात घातला. बारामती लोकसभेवर आत्तापर्यंत शरद पवार आणि त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांचे वर्चस्व राहिले आहे परंतु अजित पवारांच्या या निर्णयाने शरद पवारांना हा मोठा धक्का समजला जात होता. त्यामुळे शरद पवारांनीही अजित पवारांना धक्का देत त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना फोडून आपल्या गोटात सामिल केले आहे. त्यामुळे काकांनी आपल्या पुतण्याला शह देण्यासाठी पुतण्याचे पुतणेच फोडून अजित पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असल्याची मोठी चर्चा बारामती लोकसभा मतदार संघात होत आहे.
युगेंद्र पवार आता काका ला सोडून आत्याचा प्रचार कारणार…
अजितदादांचे लहान बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आणि अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी काका अजित पवार यांची साथ सोडून आत्या सुप्रिया सुळे यांचा प्रचार करण्याचे ठरवले आहे सुप्रिया सुळे यांच्यासाठी ते बारामती लोकसभा मतदार संघात दौरे करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता अजित पवारांना स्वतःच्या घरातूनही आव्हाने उभी केली जात आहेत आणि यामागे खुद्द शरद पवारांची रणनीती काम करत असल्याचे बोलले जात आहे. कारण बारामती लोकसभा मतदार संघात युगेंद्र पवार हे आत्तापर्यंत जास्त कुणाला माहित नव्हते मात्र लोकसभेला आव्हान उभे राहिले आणि अचानक युगेंद्र पवार यांची एंट्री झाली हे अचानक नसून ते घडवून आणल्याचे बोलले जात आहे.
युगेंद्र पवार यांच्या विषयी थोडक्यात जाणून घेऊ…
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्रीनिवास पवार हे लहान बंधू आहेत. त्यांचे युगेंद्र पवार हे चिरंजीव असून ते शरयू फाउंडेशन च्या माध्यमातून सक्रिय असल्याचे दिसते. व्हिपी कॉलेज म्हणजे विद्या प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे खजिनदार या पदावरही कार्यरत आहेत. तसेच फलटण येथील शरयू कारखाना युगेंद्र श्रीनिवास पवार पाहत असल्याचे समजते. ते सामाजिक कार्यात अग्रेसर राहून वृक्षारोपण आणि विविध सामाजिक कार्यांना हातभार लावत असल्याचे दिसते.
निवडणूक जाहीर होण्याआगोदरच प्रचाराची रणधुमाळी…
काही दिवसांत जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघात आत्तापासूनच विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीचे बॅनर झळकवले जात आहेत. बारामतीच्या विविध भागांमध्ये हे लावण्यात आल्याने आत्तापासूनच या निवडणुकीला रंग चढण्यास सुरुवात झाली आहे. तर सुप्रिया सुळे यांना काटे की टक्कर देण्यासाठी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार ह्या महायुतीच्या उमेदवार असणार असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून जाहीर करण्यात येत असून तसे कँपेन सध्या चालवले जात आहे.
पुतण्याने काकाविरुद्ध बंड केले त्यामुळे काकाने पुतण्याचे पुतणेच फोडून हे बंड थंड करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.