पुणे : सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. अवघ्या काही दिवसांवर निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सत्ताधारी आणि विरोधकांना धक्क्यावर धक्के देण्यास सुरुवात केली आहे. शिरूर येथे भाजप आणि इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या गटात प्रवेश केल्यानंतर आता एक बडा नेता अजितदादांच्या गटात प्रवेश करणार असल्याचे वृत्त हाती येत आहे. गुप्त सूत्रांनी याबाबत माहिती दिली असून काही वाहिन्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या अगोदर प्रदिपदादा कंद हे अजित पवार गटात प्रवेश करणार असे वृत्त येत होते मात्र आता आढळराव पाटील यांसारखे बडे नेते अजितदादांच्या गटात येणार असल्याच्या वृत्ताने खळबळ माजली आहे.
आढळराव पाटील हे पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभेचे माजी खासदार आहेत. शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी आणि वाहिन्यांनी दिली आहे. या वृत्ताला दुजोरा देताना, आढळराव पाटलांनी अतीतातडीची बैठक बोलवली आहे. या बैठकीत ते मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
प्रदीपदादा कंद हे अजित पवारांच्या गटात येणार असल्याचेही वृत्त…
सध्या भाजपमध्ये असलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषविलेले प्रदीप कंद हे आता पुन्हा राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटात सामिल होणार असल्याची चर्चा आहे. प्रदीप कंद हे अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून समजले जायचे. मात्र त्यांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता. सध्या त्यांच्यावर शिरूर, हवेली विधानसभा प्रचार प्रमुख म्हणून भाजपकडून जबाबदारी देण्यात आली आहे. ते अजित पवार गटात जाणार आणि त्यांना शिरूर लोकसभेची उमेदवारी मिळणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र प्रदीप कंद राष्ट्रवादीत जाण्याआधीच शिवाजीराव आढळराव पाटील हे आता सतर्क झाल्याचे दिसत आहे त्यामुळे आढळराव पाटील यांना अजित पवार गटाकडून शिरूर लोकसभेची उमेदवारी मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. आता प्रदीप कंद की शिवाजीराव आढळराव पाटील हे अगोदर अजित पवार गटात जातात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार असून शिरूर लोकसभा मतदार संघ कोणत्या पक्षासाठी सुटणार यावरही बरीचशी गणिते अवलंबून आहेत.
मागे काय म्हणाले होते आढळराव पाटील
शिरूरचे माजी खासदार आढळराव पाटील यांनी मागे बोलताना, शिरुरची जागा दोन नंबरची मतं घेतलेल्या शिवसेनेला मिळायला हवी. यासंदर्भात आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ठरवतील. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री जो उमेदवार देतील त्याचं आम्हाला काम करावं लागेल, पण शिरूरमधून सुनेत्रा पवार किंवा वळसे पाटील उभे राहतील असे मला वाटत नाही. मी माझा जास्त वेळ माझ्या लोकसभा मतदारसंघात फिरत असतो, लोकांच्या अडचणी सोडवत असतो. मी शिवसैनिक आहे, त्यामुळे मला धनुष्यबाणावर लढायला आवडेल, अशी इच्छाही त्यांनी मागे बोलून दाखवली होती.