अब्बास शेख
पुणे : बारामतीच्या पवार काका-पुतण्यांचे राजकीय वैर हे दिखावू आहे की खरोखर आहे या राज्यातील जनतेच्या शंका-कुशंकांना अखेर तिलांजली मिळाल्याचे दिसत आहे. बारामतीच्या काका-पुतण्यांचे राजकीय वैर हे आता खऱ्यात उतरताना दिसत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ह्या बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणुक लढवणार असल्याचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. सुनेत्रा पवार यांच्या निवडणुक लढण्याच्या आणि त्या जिंकून येण्याच्या शक्यता जास्त वाटत असताना आता मात्र जेष्ठ नेते शरद पवार यांनी आपले पुतणे अजित पवार यांचे टेंशन चांगलेच वाढवले असल्याचे सद्य परीस्थीतीवरून दिसत आहे.
प्रत्येक तालुक्यातील बलाबल आणि विरोध दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर आणि खडकवासला येथील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांची ताकद आणि त्यात झालेली महायुती पाहता बारामती लोकसभा मतदार संघात यावेळी महायुतीच्या खासदार निवडून येतील असा कयास लावला जात आहे किंबहुना तसे पोषक वातावरणही आहे, मात्र या सर्वांची लढाई ही राजकीय आखाड्यात कसलेल्या पैलवानाशी म्हणजेच शरद पवारांशी आहे हे आता हळू हळू जाणवू लागले आहे. दौंड तालुक्यात शरद पवारांना मानणारा जुना वर्ग असला तरी येथे कुल, थोरात, वैशाली नागवडे हे महायुतीमध्ये आहेत. त्यामुळे त्यांचा कल हा महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यात असणार आहे. सध्या सुप्रिया सुळे यांना आप्पासाहेब पवार, सोहेल खान आणि तालुक्यातील इतर महत्वाच्या नेत्यांचा पाठिंबा असून ते येथे करिष्मा घडवतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आ. राहुल कुल, मा. आ. रमेश थोरात, वैशाली नागवडे हे जरी महायुतीमुळे अजित पवारांच्या पाठीमागे उभे असले तरी त्यांच्या मागील असणाऱ्या मतदानाची परिनीती प्रत्यक्षात कशी उतरते हे मतमोजणी दिवशीच समजणार आहे. असाच काहीसा प्रकार इंदापूरमध्ये पहायला मिळत असून येथे दत्तामामा भरणे हे अजितदादांचे कट्टर समर्थक आणि हर्षवर्धन पाटील हे भाजपचे मुख्य नेते येथे आहेत. भोर येथे सुप्रिया सुळे यांना चांगले वातावरण दिसत आहे तर खडकवासला आणि पुरंदर येथे त्यांना कष्ट घ्यावे लागणार आहेत.
शरद पवारांनी बारामतीत कंबर कसली गेल्या काही दिवसांत अजितदादांचे बारामतीमध्ये झालेले पक्ष मेळावे आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी नागरिक आणि विविध तालुक्यातील नेत्यांच्या घेतलेल्या भेटीगाठी यामुळे वातावरन ढवळून निघाले होते. मात्र त्यानंतर जेष्ठ नेते शरद पवार यांनी यांनी भात्यातील एक एक अस्त्र बाहेर काढण्यास सुरुवात केली आणि नुसत्या बारामतीमध्येच अजित पवारांची दमछाक झाली. पहिली सुरुवात ही बारामतीमध्ये होऊन संपूर्ण पवार कुटुंबियांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्धार केला याबाबत खुद्द अजित पवार यांनीही बारामतीमध्ये भाष्य केले. यानंतर लगेच इंदापूरमधून आवाज आला आणि अगोदर आमदारकीचा शब्द द्या नंतर खासदारकीचा शब्द देऊ असे हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या कडाडल्या. त्यामुळे अजित पवारांना धक्क्यावर धक्के जाणवू लागले आणि आता पुन्हा त्यांच्या सख्ख्या पुतण्याने शरद पवारांची भेट घेऊन अजितदादांचे आणखीनच टेंशन वाढवले आहे.
अजित पवारांना सहज वाटणारा विजय आता हळू हळू जड होत चालला आहे आणि या सर्व घडामोडीमागे जेष्ठ नेते शरद पवार यांची राजकीय खेळी आहे हेही आता स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे शरद पवारांच्या राजकीय खेळीने अजित पवारांचे टेंशन मात्र वाढवले आहे हे नक्की.