अब्बास शेख
दौंड : दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसी मध्ये कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी जर कोणी कंपनी व्यवस्थापनाला ब्लॅकमेल, दमबाजी करत असेल तर अश्या लोकांची माहिती द्यावी. त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल असे आश्वासन दौंड चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिले आहे. ते कुरकुंभ एमआयडीसी व्यवस्थापक आणि मॅनेजर यांच्यासोबत आयोजित करण्यात आलेल्या मिटिंगमध्ये बोलत होते.
दिनांक ०७/०२/२०२४ रोजी दुपारी ०१:०० वाजता पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यांनी कुरकुंभ एमआयडीसी येथे कुरकुंभ एमआयडीसी मधील सर्व कंपनीचे व्यवस्थापक/मॅनेजर यांची मीटिंग घेतली. मीटिंगमध्ये त्यांनी कंपनी व्यवस्थापक यांना कंपनीच्या अडी अडचणी संदर्भात व्यवस्थापक यांना मार्गदर्शन व सूचना करताना सांगितले की, कंपनीच्या संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही बसवावेत, कंपनीमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षारक्षक नेमून त्यांना अलर्ट ठेवावे, कंपनी परिसरात तसेच अंतर्गत रस्ते या ठिकाणी रात्रीच्या वेळेस जास्तीचा प्रकाश असावा याकरिता रस्त्यांच्या मधील लाईट बसवावी, कंपनीमध्ये कोणी कॉन्ट्रॅक्टसाठी दमबाजी तसेच ब्लॅकमेलिंग व इतर काही गोष्टी करत असेल तर तात्काळ आम्हास तसेच पोलीस स्टेशनला माहिती द्यावी. माहिती त्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे सांगितले.
यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पुढे बोलताना, कंपनीमध्ये चोरीच्या घटना घडू नयेत याकरिता कंपनी परिसरात तसेच अंतर्गत ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात सीसीटीव्ही बसवणे गरजेचे असल्याचे म्हणत बऱ्याच वेळा कंपनीमध्ये आग लागण्याच्या घटना घडत असतात त्या करिता फायर सिस्टीम अपडेट करून ठेवावी जेणेकरून आग लागल्यास ती तात्काळ विजवता आली पाहिजे असे मार्गदर्शन व सूचना केल्या.
या मीटिंग करिता कुरकुंभ एमआयडीसी चे मुख्य अभियंता ए.बी पाटील तसेच ३५ कंपनी व्यवस्थापक / प्रतिनिधी, प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी तसेच एमआयडीसी महावितरण चे अधिकारी उपस्थित होते.