दौंड येथे वरिष्ठ दिवाणी न्यायालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न, न्याय देण्याची जबाबदारी फक्त न्यायाधीशांवर नसते – न्यायमूर्ती श्रीमती रेवती मोहिते डेरे

अख्तर काझी

दौंड : दौंड येथील दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर न्यायालयाचे उद्घाटन मा. न्यायमूर्ती श्रीमती रेवती मोहिते डेरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य अतिथी मा.न्यायमूर्ती संदीप मारणे( उच्च न्यायालय, मुंबई)मा. कालिदास नांदेडकर( प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे) तसेच महाराष्ट्र -गोवा बार कौन्सिल चे उपाध्यक्ष राजेंद्र उमाप, वरिष्ठ स्तर न्यायालयाचे न्यायाधीश जोशी ,ज्येष्ठ विधीज्ञ हर्षद निंबाळकर, ए. यु .पठाण, अविनाश आव्हाड, दौंड वकील संघाचे अध्यक्ष कैलास गायकवाड, दौंड, बारामती, इंदापूर, श्रीगोंदा वकील संघटनेचे पदाधिकारी, सदस्य यावेळी उपस्थित होते.

न्यायमूर्ती श्रीमती रेवती मोहिते डेरे मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, दौंड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय होण्यासाठी दहा वर्षे लागले, परंतु कुठल्याही गोष्टीला सुरू होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते पण यश मिळतेच हे आपण पाहिले. या यशाचे श्रेय येथील वकील संघटनांचे आहे. आपण जेव्हा म्हणतो की न्याय सर्वांसाठी, तेव्हा लोकांना त्यांचे हक्क मागण्यासाठी कोर्ट जवळ असणे गरजेचे आहे. पूर्वी येथील लोकांना बारामती येथे जावे लागायचे आता हे काम दौंडलाच होणार असल्यामुळे सर्वांसाठीच ते फायद्याचे झाले आहे. लोकांना आपल्या हक्काची जागृती झालेली आहे, होत आहे. त्यामुळे खटले वाढलेले आहेत. अशावेळी न्याय पायाभूत सोयी, सुविधा लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत याकडे आपण पाहिले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने आपण लोकांना न्याय देऊ शकतो.

कोर्ट म्हणजे न्यायाचे मंदिर आहे इतके मोठे स्थान कोर्टाला दिले आहे. त्यामुळे न्याय देण्याची जबाबदारी फक्त न्यायाधीशांवर नसते तर ती समान पणे वकिलांवर सुद्धा असते. एखाद्या केस मध्ये वकिलाने जर एखादा मुद्दा प्रभावीपणे मांडला तर न्यायाधीशाला सुद्धा विचार करण्यासाठी प्रवृत्त व्हावे लागते आणि त्याच्या मधूनच कायदा तयार होतो. सध्या उच्च न्यायालयामध्ये युवा पिढीतील वकील नवनवीन मुद्दे मांडतात व आम्हाला विचार करायला प्रवृत्त करतात.

वाद मिटण्यासारखा जर असेल तर तो मिटविण्याची जबाबदारी वकिलांवर आहे. काही वेळेस क्षुल्लक केस असते, ती त्याच स्तरावर मिटविणे हे उत्तम असते. अशा केसेस मध्ये न्याय सुद्धा लवकर मिळेल आणि हे तुमच्या अशिलाला एक प्रकारे बक्षीस दिल्यासारखे असेल की तुम्ही त्यांना लवकर न्याय मिळवून दिला. दिवाणी केसेस मध्ये तर ती केस सुरू होते त्या माणसाला त्याच्या हयातीत निकाल बघायलाच मिळत नाही. या केसचा निकाल जेव्हा लागतो तेव्हा तो माणूसच हयात नसतो. त्यामुळे न्यायाधीश व वकिलांवर ही जबाबदारी आहे की केस चा निकाल लवकर कसा देता येईल हे पाहणे. ट्रायल कोर्टातच केस चांगली चालवली नाही, जर वकिलाने अभ्यास केला नाही तर नंतर त्या केस मध्ये तुम्ही कितीही मोठा वकील दिला तरी काही उपयोग होणार नाही. केस ला लागणारे पुरावेच न्यायालयासमोर सादर केले गेले नाही तर निकाल अशक्यच. त्यामुळे युवा वकिलांवर खूप महत्त्वाची जबाबदारी आहे की, तुम्ही प्रत्येक केसचा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. ती केस आपल्या घरची ,स्वतःची आहे असे समजून ती लढवायला पाहिजे. वकिलाने नीट बाजू मांडली नाही म्हणून कोणावर अन्याय झाला नाही पाहिजे, एखाद्याला न्याय कसा मिळवून देता येईल असे आम्ही बघतो. परंतु हे फक्त काही केसेस मध्येच होऊ शकते. युवा वकिलांना सल्ला देताना त्या म्हणाल्या की, तुमच्याकडे ज्येष्ठ वकील आहेत, त्यांना अनुभव आहे त्यांचे मार्गदर्शन घ्या. कोणती पुस्तके वाचली पाहिजेत, केस कशी चालविली पाहिजे. कारण अशीलाला मिळणारा न्याय तुमच्यावर अवलंबून आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दौंड वकील संघटनेचे अध्यक्ष कैलास गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन साक्षी जैन, प्रणव भोईटे यांनी केले तर जिल्हा व सत्र न्यायाधीश कालिदास नांदेडकर यांनी आभार मानले.