जप्त केलेले सोने स्वस्तात घेऊन देण्याचे मित्राला अमिष दाखवून वकिलाने केली 15 लाखांची फसवणूक, वकील सनी बलदोटा विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल

अख्तर काझी

दौंड : दौंड कोर्टामध्ये जप्त केलेल्या सोन्याचा लिलाव होणार आहे, माझी कोर्टामधील जज साहेबांशी ओळख आहे, कोर्टामध्ये माझी चांगली सेटिंग आहे त्यामुळे मी तुम्हाला स्वस्तामध्ये सोने मिळवुन देतो असे अमिष दाखवून शहरातील एका वकिलाने आपल्याच मित्राची 15 लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सज्जन मारुती काकडे (रा. नवगिरे वस्ती, दौंड) यांनी फिर्याद दिली. दौंड पोलिसांनी अ‍ॅड. सनी अजित बलदोटा(रा. गजानन सोसायटी, दौंड) या वकिला विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार,दि. 3 जून 2023 ते 19 जुलै 2023 दरम्यान फिर्यादींनी वकील सनी अजित बलदोटा यास वेळोवेळी पैसे दिले आहेत. फिर्यादी व वकील सनी बलदोटा यांची चांगली मैत्री होती, ते एकमेकांना आर्थिक मदत करीत असत. जून 2023 मध्ये सनी अजित बलदोटा फिर्यादी यांच्याकडे आला व म्हणाला की दौंड मधील कोर्टामध्ये जप्त केलेल्या सोन्याचा लिलाव होणार आहे, माझे कोर्टामधील जज साहेबांशी चांगले संबंध आहेत व माझी कोर्टामध्ये तशी सेटिंग सुद्धा आहे. मी बऱ्याच लोकांना सोने ,गाड्या तसेच इतर वस्तू स्वस्तामध्ये मिळवून दिल्या आहेत. मी सदर लिलावामधील 60 तोळे सोने 25 हजार रु. तोळ्याप्रमाणे तुम्हाला मिळवुन देतो, तुम्ही 15 लाख रुपयांची तजवीज करून ठेवा. लिलाव झालेली रीतसर पावती सुद्धा कोर्टामधून तुम्हाला मिळवून देतो, तुम्हाला कायदेशीर काहीही अडचण येणार नाही असे सनी अजित बलदोटा याने फिर्यादीस विश्वास दाखविल्याने फिर्यादी यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून सुरुवातीस 9 लाख 80 हजार रुपये त्याच्या बँक खात्यावर जमा केले.

त्यानंतर पुन्हा 2 लाख 50 हजार रु. व 2 लाख 70 हजार रुपये नातलग व मित्रांकडून उसने घेऊन सनी बलदोटा याला फिर्यादी यांनी दिले आहेत. फिर्यादी यांनी 19 जुलै 2023 पर्यंत तब्बल 15 लाख रुपये सनी अजित बलदोटा याला दिल्यानंतर सदर सोने लिलावाबाबत विचारणा केली असता, अद्याप लिलाव झालेला नाही, लवकरच लिलाव होणार आहे, लिलाव झाला की तुम्हाला सोने मिळवून देतो असे म्हणून सनी बलदोटा वेळ मारून न्यायचा. त्यामुळे फिर्यादी यांना शंका आल्याने त्यांनी सदर सोन्याच्या लिलावाबाबत माहिती घेतली असता त्यांना असे समजले की दौंड कोर्टामध्ये अशा प्रकारचा कोणताही लिलाव होत नाही. अशी माहिती मिळाल्यानंतर फिर्यादी यांनी सनी बलदोटा याला भेटून सदरची हकीकत सांगितली. व मला माझे पैसे परत करा नाहीतर मी तुमच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार करणार आहे असेही फिर्यादी यांनी बलदोटा याला सांगितले.

त्यामुळे सनी बलदोटा याने फिर्यादी यांना पंधरा लाख रुपयांचा धनादेश दिला. फिर्यादी यांनी सदरचा धनादेश बलदोटा यांच्या बँकेमध्ये दाखविला असता त्या खात्यावर रक्कम नाही अशी माहिती मिळाली. त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी वकील सनी अजित बलदोटा यांच्या विरोधात दौंड पोलिसांकडे तक्रार दाखल केली. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश अबनावे करीत आहेत.

सदर प्रकरणात स्वस्तामध्ये सोने घेऊन देतो असे आमिष दाखवून दौंड शहर तसेच विविध भागामध्येही फसवणुकीचे प्रकार घडलेले आहेत अशी चर्चा होत आहे. पोलीस प्रशासनाने जर अशा घटनांचा कसून तपास केला तर अनेक आर्थिक फसवणुकीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे असे बोलले जात आहे.