दौंड : दौंड तालुक्यातील वरवंड येथे वरवंड चे उपसरपंच प्रदिप किसन दिवेकर यांसह 8 जणांवर बेकायदा जमाव जमवून मारहाण केल्याप्रकरणी आणि 7 तोळ्यांचे सोन्याचे गंठण लंपास केल्याप्रकरणी यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत विजय भास्कर दिवेकर यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीमध्ये नमूद केल्यानुसार वरवंड चे उपसरपंच प्रदीप दिवेकर व फिर्यादी यांचा पुतण्या वैभव दिवेकर यांच्यामध्ये दि.3 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:45 वाजता गॅस च्या टाकीवरून वाद झाला होता. त्याच दिवशी सकाळी 11:15 वाजता फिर्यादी हे त्यांच्या भावाचे अश्वमेघा या हॉटेलमध्ये बसले असताना तेथे उपसरपंच प्रदीप दिवेकर व त्यांचे साथीदार संदीप दिवेकर, अंकुश दिवेकर, युवराज दिवेकर, संतोष दिवेकर, अभिषेक दिवेकर, बिभीषण दिवेकर, योगेश दिवेकर हे आले आणि त्यांनी फिर्यादी यांना तुझ्या पुतण्याला बोलवून घे, त्याला माज आलाय, त्याची चामडी लोंबवतो असे म्हणून फिर्यादि यांच्या कपाळावर गजाने मारहाण केली. यावेळी बिभीषण दिवेकर याने फिर्यादी यांना कोयत्याने मारहाण करत असताना त्यांनी कोयता धरताना त्याचे टोक फिर्यादी यांच्या डोळ्याखाली लागले हे पाहून फिर्यादी यांचे भाऊ राजेंद्र दिवेकर आणि त्यांची पत्नी सुनीता राजेंद्र दिवेकर हे सोडविण्यासाठी आले असता त्यांना अभिषेक दिवेकर याने मारहाण करत सुनीता दिवेकर यांच्या गळ्यातील अंदाजे 7 तोळ्यांचे 1 लाख 40 हजार रुपयांचे गंठण जबरदस्ती काढून ते खिशात घातले असे फिर्यादीत म्हटले असून भांडणे सुरू असताना तेथे फिर्यादी यांचा पुतण्या वैभव दिवेकर हा आला असता त्यासही वरील सर्व आरोपींनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
यवत पोलिसांनी विजय दिवेकर यांच्या फिर्यादीवरून वरील 8 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सपोनि नागरगोजे हे करीत आहेत.