मुंबई : राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीत परळी वैजनाथ, घृष्णेश्वर आणि सप्तशृंगी देवी तीर्थक्षेत्रांच्या ५३१ कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली.
श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग विकासाच्या २८६.६८ कोटी रुपयांच्या सुधारित विकास आराखड्यास तसेच श्री क्षेत्र घृष्णेश्वर तीर्थक्षेत्राच्या सुधारित १६३ कोटी आणि श्री क्षेत्र सप्तशृंगी देवी या तीर्थक्षेत्राच्या ८१.८६ कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली.
मंत्रालयात झालेल्या शिखर समितीच्या या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे, आमदार प्रशांत बंब, मुख्य सचिव मनोज सौनिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. गोविंदराज, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ आदी यावेळी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले.