अहमदनगर : मांजराला वाचवण्यासाठी एकाच कुटुंबातील चार आणि अन्य एक अश्या पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात असणाऱ्या वाकडी येथे घडली आहे. बायोगॅसच्या खड्ड्यात पडलेल्या मांजरीला वाचवण्यासाठी हे सर्वजण त्या खड्ड्यात उतरले असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नेवासा तालुक्यातील वाकडी या गावात साधारण दोनशे फूट खोल असणाऱ्या बायोगॅसच्या खड्ड्यात एक मांजर पडले होते. त्याला वाचवण्यासाठी अगोदर एक जण खाली उतरला. मात्र तो बाहेर येत नसल्याने त्याला पाहण्यासाठी पुन्हा एकजण खाली उतरला. तोही बाहेर येत नसल्याने एकामागे एक असे सहाजण त्या खड्ड्यात उतरले होते. मात्र विषारी वायुमुळे यातील पाचजन बेशुद्ध पडले तर एकाला कसेबसे वाचविण्यात यश आले.
या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी या बायोगॅस च्या खड्ड्याजवळ जाऊन यातील अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मात्र या शोष खड्ड्यात शेणाचं प्रमाण जास्त असल्याने त्यांना वाचविण्यासाठी अडथळे येत होते. तरीही ग्रामस्थांनी एकदुसऱ्याच्या सहाय्याने एकाला लवकर बाहेर काढले त्यामुळे त्याचे प्राण वाचले मात्र यात अगोदर अडकलेल्या इतर पाच जणांचा मात्र दुर्दैवी मृत्यू झाला होता.
या खड्ड्यात पडलेल्यांमध्ये एकाच कुटुंबातील चार जन तर अन्य एकजण हा त्याच कुटुंबाचा नातेवाईक असल्याचे समोर येत आहे. माणिक गोविंद काळे, संदीप माणिक काळे, बबलू अनिल काळे, अनिल बापूराव काळे, बाबासाहेब गायकवाड अशी या पाच मृत व्यक्तींची नावे आहेत.