दौंड’मध्ये चोरट्यांनी औषधाचे दुकान फोडून 45 हजार रुपयांची रोकड केली लंपास, चोरटे CCTV मध्ये झाले कैद



|सहकारनामा|

दौंड : (शहर प्रतिनिधी) 

दौंड शहरातील दौंड-कॉलेज (सावरकर नगर) परिसरातील शिवनेरी अपार्टमेंट इमारती मधील युनिटी मेडिकेअर या औषधाच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी अंदाजे 45 हजार रुपयांची रोकड  चोरून नेल्याची घटना घडली आहे.

दुकानाचे मालक दादा भाऊसो. लोणकर (रा.गिरिम, दौंड) यांनी याप्रकरणी दौंड पोलिसात फिर्याद नोंदविली असून पोलिसांनी तीन अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहिती नुसार, फिर्यादी दि. 10 सप्टेंबर रोजी रात्री 9 च्या दरम्यान दुकान बंद करून घरी गेले. दुकान बंद करताना त्यांनी दिवसभरातील माल विक्रीचे 45 हजार रुपये दुकानातील कॅश काऊंटर मध्येच ठेवलेले होते.दि.11 रोजी सकाळी 6.30 वा. फिर्यादी यांना त्या इमारतीत राहणाऱ्या मित्राचा फोन आला की, तुमच्या दुकानाचे शटर उचकटलेले दिसत आहे. त्यामुळे फिर्यादी लगेच आपल्या दुकानाकडे आले असता, त्यांना दुकानाच्या शटरच्या एका बाजूचा कोपरा उचकटलेला दिसला. शटरचे कुलूप उघडून दुकानात जाऊन पाहिले असता दुकानातील वस्तू अस्ताव्यस्त झालेल्या होत्या व कॅश काऊंटर तोडलेले होते, व त्यातील 45 हजार रु. सुद्धा गायब होते. 

फिर्यादी यांनी दुकानातील CCTV फुटेजची पाहणी केली तेव्हा तीन चोरट्यांनी चोरी केली असल्याचे त्यामध्ये दिसत आहे.