संचारबंदी मोडल्याने दौंड तालुक्यातील या ‛4’ गावांमधून पोलिसांनी केल्या ‛50’ दुचाकी जप्त, 50 चालकांवरही गुन्हा दाखल



दौंड : सहकारनामा ऑनलाईन(अब्बास शेख)

–  केंद्र सरकारचे निर्देशानुसार दिनांक १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्याची माहिती असताना आणि  संसर्गजन्य रोग पसरू शकतो याची जाणीव असतानाही आदेशाचे भंग करून मोटरसायकल वरती विनाकारण फिरत असलेल्या टोलभैरवांना यवत पोलिसांनी चांगलाच हिसका दाखवला आहे. यवत पोलिसांनी यवत मध्ये १६, केडगाव मध्ये  ११, वरवंड  मध्ये  १३, आणि पाटस मध्ये १०, अश्या एकूण ५० दुचाकी जप्त करून दुचाकी चालवणाऱ्या ५० दुचाकी स्वारांवर गुन्हा दाखल केला आहे. संचारबंदी असताना आणि संपूर्ण देश हा लॉक डाउन मोडवर असतानाही आपल्याला कोणी काही करणार नाही या अविर्भावात फिरणाऱ्यांना मोठा झटका बसला आहे, अनेकांनी नियम मोडून फिरण्यासाठी मेडिकलची चिट्ठी, बाजाराची पिशवी गाडीला गुंतवून आम्ही जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी आलो आहोत असे भासवत होते मात्र हे महाभाग मेडिकलच्या चिठ्ठ्या दिवसभर आपल्या खिशात घेऊन गावभर हिंडत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येत होते त्यामुळे पोलिसांनी अशाही महाभागांवर कारवाई करून त्यांच्या आनंदावर विर्जन टाकले आहे. याबाबत यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी माहिती देताना औषधे, भाजीपाला, किराणा खरेदीकरीता पायी चालत जावे. विनाकारण वाहन घेवुन फिरताना मिळुन आल्यास वाहन जप्त करण्यात येईल असा इशारा दिला आहे.