कोल्हापूर राड्याप्रकरणी आतापर्यंत 36 जणांना अटक, आक्षेपार्ह स्टेटस ठेवणारे निघाले कॉलेजचे अल्पवयीन विद्यार्थी

सुधीर गोखले

कोल्हापूर : कोल्हापूरात झालेल्या दगडफेक आणि तोडफोड प्रकरणी आतापर्यंत 36 जणांना अटक करण्यात आलीय. त्यातील 3 जण अल्पवयीन आहेत. तर एकूण 400 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेयत. आक्षेपार्ह स्टेटस ठेवणारे हे कॉलेज विद्यार्थी असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. त्यांना ताब्यात घेतलं असून, आक्षेपार्ह व्हिडिओ त्यांना कुठून मिळाला? याचा तपास पोलिसांकडून केला जातोय.

कोल्हापुरात सध्या शांतता असून, पुन्हा अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यास कठोर कारवाईचे आदेश देण्यात आलेयत. तसंच कोल्हापुरातील इंटरनेटसेवा रात्री 12 पर्यंत बंद ठेवण्यात आल्याची माहिती कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिलीय
‘महाराष्ट्राच्या लौकिकतेला शोभणार नाही’
कोल्हापूर राड्यानंतर शरद पवारांनी जनतेला शांतता राखण्याचं आवाहन केलंय. कोल्हापूरमध्ये जे काही घडलं ते महाराष्ट्राच्या लौकिकतेला शोभणार नाही…महाराष्ट्र प्रिय राज्य आहे, सर्वसामान्य लोकांना कायदा हातात घेण्याची आपली प्रवृत्ती नाही…सर्व सामान्य जनतेनं शांतता राखायला हवी, असं आवाहन पवारांनी केलंय.

कुणीतरी जाणीवपूर्वक वादविवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल त्यांनाही माझा आक्षेप आहे, याची किंमत सामान्य माणसाला द्यावी लागते. आपण सगळ्यांनी यंत्रणेला सहकार्य केलं तर ही परिस्थिती तातडीने बंद झालेली दिसून येईल, असं पवार यांनी म्हटंलय. कोल्हापूर शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. शाहू महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामान्य माणसांच्या हिताची जपणूक केली पाहिजे, असं आवाहनही पवारांनी केलं आहे.