दौंड पोस्ट ऑफिसमध्ये चोरांचा डल्ला, 35 हजारांचे 6 मोबाईल लंपास



दौंड : शहरातील डॉ. आंबेडकर चौक ते नगर मोरी रस्त्यावरील, काळुबाई मंदिर शेजारील टपाल कार्यालयातून (पोस्ट ऑफिस) चोरट्यांनी 35 हजार रुपयांचे 6 मोबाईल संच चोरून नेले असल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत दौंड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. टपाल कार्यालय व्यवस्थापक (पोस्ट मास्तर) अफरोज सिराज आतार (रा.दौंड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

दौंड पोलिसांच्या माहितीनुसार, दि.7 ऑक्टोबर रात्री 7.30 ते दि.8 ऑक्टोबर सकाळी 8.45 वा. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शहरातील टपाल कार्यालयाच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कार्यालयातील ट्रेझरी खोलीचा कडी – कोयंडा चोरट्यांनी तोडून खोलीतील 6 मोबाईल संच व 5 चार्जर असा एकूण 35 हजार 500 रु. चा ऐवज चोरून नेला. 

दि.8 ऑक्टोबर रोजी सकाळी नेहमीप्रमाणे पोस्टमास्तर ऑफिस कार्यालयात आले असता त्यांना मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. आत जाऊन पाहिले असता ट्रेझरी दरवाजाचे कुलूपही तुटून पडलेले होते. या खोलीत असलेले लोखंडी पेटीचे कुलूप तोडलेल्या अवस्थेत दिसले व त्या पेटीतील सहा मोबाईल संच व चार्जर गायब असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे पोस्ट मास्तर यांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात चोरीची फिर्याद दिली असून दौंड पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.