केडगाव ‛उपसरपंच’ पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार..! राष्ट्रवादीचीही मोर्चे बांधणी सुरू

दौंड : दौंड तालुक्यातील मिनी शहर म्हणून संबोधले जाणाऱ्या केडगावची उपसरपंच पदाची निवडणूक येत्या 18 ऑक्टोबरला होत असून यामध्ये उपसरपंचपदी आता कुणाची वर्णी लागते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
केडगाव ग्रामपंचायत चे विद्यमान उपसरपंच अशोक हंडाळ यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले आहे. त्यामुळे येत्या सोमवारी दि. 18 ऑक्टोबरला उपसरपंच पदाची निवडणूक पार पडणार असून या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आपला उमेदवार उभा करणार असल्याची माहिती केडगाव ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य दिलीप हंडाळ यांनी दिली आहे. उपसरपंच पदी आमचा उमेदवार निवडून येईल असा विश्वासही दिलीप हंडाळ यांनी व्यक्त केला आहे.

तर कुल गटाला हि निवड सोपी वाटत असून त्याचे कारणही तसेच आहे. सध्या केडगाव ग्रामपंचायतीवर आमदार राहुल कुल (भाजप) गटाची सत्ता असून भाजप चे 11 सदस्य आणि सरपंच असे 12 जण तर राष्ट्रवादी काँग्रेस (मा.आ.रमेश थोरात गट ) चे 6 ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यामुळे साहजिकच कुल गटाला हि निवड सोपी असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
उपसरपंच पदासाठी आ.कुल गटातून सध्या दोन नावे पुढे येत असून यातील कुणाला उपसरपंच पदाची उमेदवारी मिळणार आणि कुणाच्या गळ्यात उपसरपंचकीची माळ पडणार हे येत्या काही दिवसांत समजणार आहे.