दौंड : शहर प्रतिनिधी (अख्तर काझी)
दौंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पक्षाचे नगर पालिकेतील गटनेते बादशहा शेख यांच्यातील वाद विकोपाला पोहोचण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आगामी दौंड नगरपालिका निवडणूक 3-4 महिन्यांवर येऊन ठेवली असता या वादाचा निवडणुकीवर मोठा परिणाम होऊन त्याचा फटका पक्षाला भोगावा लागतोय की काय अशी भीती राष्ट्रवादी पक्षातील छोट्या कार्यकर्त्यांना वाटू लागली आहे.
दि.5 ऑक्टोबर रोजी खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शहरात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मा. आमदार रमेश थोरात सह सर्वच पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित होते.
शहरातील नगरसेवकांना व कार्यकर्त्यांना पक्षाने व पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कसे वाऱ्यावर सोडले आहे याचा पाढा बादशहा शेख यांनी मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या सुप्रिया सुळे यांच्यासमोर वाचला. शहरात कुल- कटारिया यांच्या बरोबर संघर्ष करताना येथील नगरसेवकांची व कार्यकर्त्यांची दमछाक होत आहे, कटारिया यांनी पक्षाच्या नगरसेवकांच्या प्रभागातील कामा विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत, त्या याचिकांच्या कामासाठी कटारिया तीन तीन मोठे वकील न्यायालयात उभा करतात, नगरपालिकेचे विषय न्यायप्रविष्ट असताना जिल्हाधिकारी याच कामाच्या चौकशीसाठी कमिटी नेमतात. आपला पक्ष मात्र या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करून आम्हाला काहीच मदत करत नाही त्यामुळे आम्ही एकाकी पडत आहोत. कुल- कटारिया येथील औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांमध्ये येथील युवकांना नोकऱ्या मिळवून देत आहेत, आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना मात्र एकासही नोकरी देता आलेली नाही. बारामती, इंदापूर मध्ये तुम्ही मोठाली कॉलेज उभारत आहात, दौंडला मात्र उपेक्षित ठेवण्यात येत आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेरगावी पायपीट करावी लागत आहे अशा अनेक विषयांना बादशहा शेख यांनी हात घातला अशी माहिती उपस्थित कार्यकर्त्यांनी दिली.
बादशहा शेख यांचे पक्षावरील आरोप ऐकून सुप्रिया सुळे अवाक झाल्या तर मा.आमदार रमेश थोरात यांनी बादशाह शेख यांना बोलताना मध्येच थांबवत पक्ष व आम्ही तुम्हाला वेळोवेळी मदत करीत आलो आहोत, मी स्वतः या कामासाठी नगरसेवकांना घेऊन जिल्हाधिकारी यांना भेटलो आहे असे शेख यांना दरडवल्या सारखेच बोलले. थोरात यांचे मोठ्या आवाजातील बोलणे ऐकून बादशहा शेख यांनी आपले गाऱ्हाणे मांडणे बंद केले व आपल्या समर्थकांना घेऊन ते मेळाव्यातून बाहेर पडले अशी माहिती उपस्थित कार्यकर्त्यांनी दिली.
दुसऱ्या दिवशी पक्षाचे पदाधिकारी व बादशाह शेख यांची पुणे येथे खा.सुप्रिया सुळे यांच्यासोबत बैठक झाली मात्र या बैठकीतही काहीच तोडगा निघाला नसल्याचे कार्यकर्ते सांगतात.
बादशहा शेख मेळाव्यात जे बोलले ते खरे बोलले आहेत हीच शहरातील खरी परिस्थिती आहे अशा प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून येत आहेत. दौंड मध्ये बादशहा शेख यांची मोठी क्रेझ आहे, आणि त्यांचा मानणारा वर्ग ज्या बाजूला आपला कौल मांडतो त्या बाजूचे पारडे जड होते असा आजपर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे पक्षावर नाराज बादशहा शेख आगामी दौंड नगरपालिका निवडणुकीत पक्षाशी जुळवून घेतात की आपली वेगळी चूल मांडतात याकडे येथील सर्वच राजकीय पक्षांचे व संघटनांचे लक्ष लागून राहिले आहे.