अखिल भारतीय केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त 182 जणांचे रक्तदान

दौंड : अखिल भारतीय केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष तथा माजी आमदार जगन्नाथ उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त दौंड तालुक्यातील पारगाव, चौफुला आणि दौंड शहर येथे सुमारे 182 रक्तदात्यांनी रक्तदान केले. जगन्नाथ उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संपूर्ण भारतभर रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते अशी माहिती आयोजकांनी दिली.

अखिल भारतीय केमिस्ट संघटनेकडून देशभरात रक्तदान शिबिर राबवून 75 हजार बाटल्या रक्त संकलित करण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्याचाच एक भाग म्हणून पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशन चे सचिव अनिल बेलकर यांनी आवाहन केले होते. त्यांनी केलेल्या आवाहनानुसार 24 जानेवारी 2025 रोजी दौंड तालुक्यातील पारगाव, चौफुला, दौंड शहर या तीन ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

तालुक्यातील या तिन्ही रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांचा चांगला प्रतिसाद पहायला मिळाला. पारगाव येथील रक्तदान शिबिरामध्ये 77 रक्तदात्यांनी रक्तदान केले, चौफुला येथील शिबिरामध्ये 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले तर दौंड शहर येथील  शिबिरामध्ये 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तिन्ही ठिकाणी मिळून साधारण 182 लोकांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी दौंड तालुक्यातील केमिस्ट बंधू, भगिनी आणि पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.