दौंड तालुक्यात शिवसेनेने डोके वर काढले

दौंड :
दौंड तालुक्यात मागील दोन वर्षांपासून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत असून तालुक्यांतील विविध गावांतून शेकडो युवकांनी आत्तापर्यंत हाती शिवबंधन बांधले आहे.

दौंड तालुक्यामध्ये शिवसेनेचे विभागीय जिल्हा प्रमुख महेश पासलकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांची फौज उभी करण्याचे काम केले जात असून दौंड तालुक्यातील चौफुला या मध्यवर्ती ठिकाणी त्यांनी शिवसेनेचे आलिशान असे कार्यालय उभारले आहे. या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाला आत्तापर्यंत अनेक दिग्गज शिवसैनिकांनी भेटी दिल्या असून शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी येथे आवर्जून भेट देत महेश पासलकर यांच्यासोबत बसून या परिसरातील राजकीय आढावा घेतला आहे.
शिवसेनेत या भागात युवा नेतृत्व तयार झाल्याने अनेक युवक यामध्ये सहभागी होत आहेत.

काल दौंड विधानसभा मतदार संघातील वाखारी या गावामधील राहुल शेळके, जीवन शेळके, योगेश शेळके, मुकुंदा कामठे, आकश शिपलकर, सागर इनामदार, निलेश चव्हाण या युवा तरूणांनी दौंड विधानसभा शिवसेना मध्यवर्ती कार्यालय चौफुला या ठिकाणी शिवसेना जिल्हा प्रमुख महेश पासलकर यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे.
या वेळी शिवसेना उपतालुका प्रमुख विजयसिंह चव्हाण, युवा सेना जिल्हा समन्वयक निलेश शिवाजीराव मेमाणे, युवा सेना तालुका युवा अधिकारी समिर भोईटे (पडवी ग्रामपंचायत सदस्य) संदीप मोरे (शिवसेना वाखारी शाखा प्रमुख) हे शिवसेना पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.