– अब्बास शेख
पुणे : संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. गावा गावातील प्रत्येक कार्यकर्ता कसा पेटून उठेल आणि तो आपल्यासाठी कशापद्धतीने काम करेल यासाठी आत्तापासूनच गाव पुढारी व्युहरचना अखताना दिसत आहेत.
याच व्युहरचनेतून मग आता पुन्हा एकदा गाव पुढाऱ्यांना आपले वेळे पुरते मानलेले हंगामी मित्र आणि कार्यकर्त्यांची आठवण येऊ लागली आहे. त्यासाठी आत्तापासूनच गरज नसली तरीही व्हाट्सअप, फेसबुकवरून या हंगामी मानलेल्या मित्रांची आणि कार्यकर्त्यांची आठवण डावपेच टाकण्यात तरबेज असणाऱ्या या गावपुढाऱ्यांना येऊ लागली आहे. त्यामुळे पाच वर्षे अडगळीत पडलेले ‘मित्र’ आणि कार्यकर्ते आता सक्रिय करण्यासाठी हे गाव पुढारी मनात नसले तरीही त्यांचे फोटो, वाढदिवस शुभेच्छा देण्यासाठी नुसती धडपड करताना दिसत आहेत. कुणाचेही लग्न असो, कोणताही कार्यक्रम असो हे पुढारी आता वेळेअगोदरच तेथे हजर होत असल्याचे चित्र दिसत आहे.
गेल्या दोन वर्षात लॉकडाउनमध्ये सोईनुसार आपल्या मानलेल्या मित्रांकडे आणि कार्यकर्त्यांकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या या गावपुढाऱ्यांना आता अचानकपणे आपल्या मित्र परिवाराची मोठ्या प्रमाणावर आठवण येऊ लागली आहे. या सर्व पुतना मावशीच्या प्रेमा मागील वस्तुस्थिती माहिती नसावी इतपत ते मित्रही मूर्ख नाहीत, पण ऐनवेळी मतलब साधण्यात पटाईत असणाऱ्या या राजकारण्यांना आता सोबत राहूनच धडा शिकविण्याचा निश्चय यावेळी या मित्र आणि कार्यकर्त्यांनी अगोदरपासूनच केल्याचे त्यांच्या चर्चेतून आता समोर येत आहे.