|सहकारनामा|
दौंड : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे साहेब यांचे आश्वासक नेतृत्व व गेली २ वर्षापासून त्यांचे नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या माध्यामातून शिवसेना पक्षाने राज्यातील गोरगरीब शेतकरी यांच्यासाठी राबविलेल्या विविध योजना, पीक विमा कंपन्याविरुद्ध संघर्ष करून शेतकर्याना मिळवून दिलेली मदत, कोरोना महामारीमध्ये सामान्य जनतेसाठी प्रामाणिकपणे राबविण्यात आलेले उपक्रम व गेल्या अनेक दशकांपासून मराठी माणूस, शेतकरी, कष्टकरी जनतेच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या उद्धव ठाकरे यांचे कार्यशैली व संयमी व्यक्तीमत्व यावर प्रभावित होऊन ज्ञानदेव उर्फ माऊली आहेर , पुणे जिल्हा युवा अध्यक्ष, रयत क्रांती संघटना व त्यांचे समर्थक शंकरराव शितोळे, प्रशांत जगताप , बाळासाहेब कोंडे , गणेश गायकवाड यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय चौफुला येथे जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या उपस्थितीत शिवबंधन बाधून शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी, माऊली आहेर म्हणाले की, गेल्या २० वर्षापासून शेतकरी चळवळीत काम करत असताना आलेले अनुभवातून व सद्यस्थितीत मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शेतक-यांबाबत असलेली तळमळ पाहून शेतकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून माझ्या कार्य शैलीला नक्कीच बळ मिळणार आहे. यापुढे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व मा.उद्धव ठाकरे साहेब यांचे प्रेरणेतून युवक, कामगार आणि शेतकरी यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्षाचे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या धोरणाने संपूर्ण ताकदीने पक्षासाठी काम करणार आहे. तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या नेतृत्वाखाली दौंड तालुक्यात पक्षाची वाटचाल वेगाने होत असून पक्ष प्रवेशासाठी हीच योग्य वेळ असल्याचे आहेर म्हणाले.
जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी माऊली आहेर व पक्ष प्रवेश केलेल्या सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना दौंड तालुका प्रमुख देविदास दिवेकर, विभाग प्रमुख हनुमंत निगडे व इतर शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.