अब्बास शेख
पुणे : माणसाने ठरवले तर तो काहीही करू शकतो. त्याने ठरवले तर मग तो चंद्रावरही जाऊ शकतो. ज्या गोष्टी असाध्य वाटतात त्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन त्या साध्यही करता येतात. फक्त त्यासाठी हवी प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द, चिकाटी आणि मेहनत. मग कोणतेही काम तुम्हाला अवघड नाही हे अनेक ध्येयवेड्या युवकांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे.
आज आपण असाच एका सर्वसामान्य कुटूंबातील युवकाचा प्रेरणादायी सफल प्रवास आपल्या ‛सहकारनामा’च्या “घे भरारी” सदरातून जाणून घेणार आहोत.
असिफ नबीभाई शेख असे या 26 वर्षीय युवकाचे नाव असून तो पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात असणाऱ्या केडगाव-आंबेगाव येथील रहिवासी आहे. असिफ हा एका सामान्य कुटुंबात जन्माला आला. आई, वडील, बहीण आणि लहान भाऊ असे त्यांचे पाचजणांचे कुटुंब. घरची परिस्थिती बेताचीच. पानशेत, वरसगावचे पुनर्वसन दौंड तालुक्यातील केडगाव-आंबेगाव येथे झाल्याने त्यांना आजोबांच्या काळात थोडीफार शेती मिळाली. मात्र शेतीतमध्ये फक्त खाण्यापूरते उत्पन्न निघत असल्याने असिफच्या आई, वडिलांनी चिकन दुकानाचा व्यवसाय सुरू करत आपल्या तीन मुलांना चांगले शिक्षण द्यायचे हा निश्चय केला.
1994 साली जन्मलेला असिफ तसा शालेय जीवनापासून अभ्यासाची ओढ असणारा मुलगा म्हणून गणला जाऊ लागला. शाळेत टॉप विद्यार्थ्यांमध्ये तो अग्रभागी असायचा. त्याची परिस्थिती त्याला माहिती होती आणि ती बदलायची आहे हा निश्चय त्याने त्या लहान वयात केला होता हे विशेष.
बारावी नंतर असिफ ने मेकॅनिकल इंजिनिअरिंग केले. तो महाविद्यालयात कायम टॉप येत असल्याने त्याला कॉलेज कॅम्पसमधून IT मध्ये प्लेसमेंटची संधी मिळाली आणि त्या संधीचे त्याने सोने करत येथूनच त्याने यश शिखरे पादाक्रांत करायला सुरुवात केली.
2015 साली सॉफ्टवेर इंजिनीअर म्हणून असिफला ‛कॉग्नीझंट’ कंपनीमध्ये प्रथम संधी मिळाली. तेथे त्याने तीनवर्षे काम पाहिल्यानंतर त्यास ‛एक्सेंचर’ या कंपनीची ऑफर आली आणि त्याने 2019 मध्ये एक्सेंचर जॉईन केली. या कंपणीतही स्वतःच्या जिद्द , चिकाटी आणि कसबवर त्याने सर्वांचीच मने जिंकली आणि काही काळातच कंपनीने त्यास मोठ्या पदाची ऑफर केली. पण असिफचे ध्येय हे विस्तारित असून त्याने जागतिक बाजारपेठेत आपला ठसा उमटविणाऱ्या ‛डेल’ या कंपनीत आता ‛सिनिअर आर्किटेक’ म्हणून आपले काम सुरु केले आहे. आणि त्याचे वार्षिक पॅकेज आहे 23’ लाख रुपये, म्हणजे दर महिन्याला जवळपास 2 लाख रुपये. ज्याच्या संपूर्ण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नही कधी एक लाखाच्या पुढे गेले नाही त्याच कुटुंबातील एक मुलगा आता महिन्याला दोन लाख रुपये कामावतोय हे पाहून त्याच्या आई, वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू नक्कीच तरळतात.
मेकॅनिकल इंजिनीअरिंग आणि नंतर कॅम्पस प्लेसमेंटमधून असिफने अवघ्या वयाच्या 26 व्या वर्षी ‛डेल’ सारख्या जगविख्यात कंपनीत ‛सिनिअर आर्किटेक’ म्हणून कामास सुरुवात केली आहे. स्वतःची महत्वकांक्षा, जिद्द, अभ्यास याच्या जोरावर त्याने काही वर्षांत हे शिखर सर केले आहे. जगातील विविध देशांमध्ये जाऊन काम करण्याची संधी असिफला अवघ्या 25-26 वर्षांत मिळाली आहे.
सर्वसामान्य कुटूंबातील लोकांनी आपल्या मुलांना शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये जाण्यास मदत केली तर कोळशाच्या खाणीतून सुद्धा हिरे मिळतात ही म्हण चुकीची ठरणार नाही. आज महिन्याला जवळपास 2 लाख रुपये पेमेंट घेणाऱ्या असिफने अजूनही आपली माणुसकी आणि आपला भूतकाळ विसरला नाही हे विशेष सामाजिक आणि धार्मिक कामांमध्ये तो आजही अग्रेसर राहून मोठे योगदान देत आहे. आणि बडेजाव, मी पणा, गर्व या गोष्टींपासून दूर राहून प्रत्येकाच्या सुख दुःखात तो सामील होतो हा त्याचा चांगुलपणा आहे.