चौफुल्याजवळ भरधाव ‘थार’ गाडीच्या धडकेत युवक ठार

केडगाव (दौंड) : भरधाव वेगात निघालेल्या थार गाडीच्या धडकेत एका २१ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना २४ सप्टेंबर रोजी दुपारी ४:२६ च्या सुमारास बाळूमामा मंदिरा समोर चौफुला – सुपे रस्त्यावर घडली आहे.

या घटनेची फिर्याद राजेंद्र कांबळे (वय ३३ वर्षे व्यवसाय ट्रान्सपोर्ट रा. बोरीपार्धी, धायगुडेवाडी ता.दौंड, पुणे) यांनी दिली असून या अपघातामध्ये त्यांचा मेहुना शुभम पवार (वय २१ वर्षे,सध्या रा.धायगुडेवाडी, चौफुला ता.दौंड) याचा मृत्यू झाला आहे. शुभम हा पल्सर मोटार सायकलवरून देवाचे दर्शन घेण्यासाठी चालला होता.

यावेळी आरोपी ओम बबन होले (रा. बोरीपार्धी धायगुडेवाडी ता.दौंड,पुणे) हा त्याच्या ताब्यातील थार कंपनीची चारचाकी गाडी हयगईने, अविचाराने, रहदारीचे नियमांकडे दुर्लक्ष करून सुपा बाजुकडुन चौफुला बाजुकडे भरधाव वेगात घेवुन जात होता. यावेळी समोरून येणाऱ्या शुभम पवार याच्या पल्सर मोटार सायकलला थार गाडीची जोरदार धडक बसून यात शुभम हनुमंत पवार याचा जागीच मृत्यू झाला. यवत पोलिस ठाण्यात आरोपी ओम बबन होले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास यवत पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गाडेकर हे करीत आहेत.