खेड (कोकण) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे जेष्ठ नेते रामदास कदम यांनी कोकणातील खेड येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर चौफेर टिका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करून सत्ता आणि खुर्चीसाठी केवळ काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षासोबत हात मिळवणी केली अशी टिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
खेड येथील सभेत शिवसेना नेते रामदास कदम यांनी बोलताना, मला कायम दुजाभावाची वागणूक दिली. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी गद्दारी का केली. बेईमानी आम्ही केली नाही. माझा मुलगा योगेश कदमला राजकारणातून संपवायचा प्रयत्न केला. 20 आमदारांना दारातून गेटआउट केले त्यामुळे लोक तुमच्यासोबत कसे राहतील. ही सभा पाहून आता तुमची अफजल खानासारखी येथे यायची हिम्मत होणार नाही असं इथली जनताही सांगतेय. तुम्ही लोकांना सांगताय की मी येथे मोकळा आलोय माझ्याकडे काही नाही, मग आम्ही जे खोके तुम्हाला दिले होते ते इथे आणायचे होते ना. तुम्ही सांगताय आमच्याकडे काही नाही, पण कुणाचे हॉटेल बाहेर देशांमध्ये आहे ते एकदिवस मी बाहेर आणणार. आम्ही स्वछ जगलोय, कुठे डाग लावून घेतला नाही त्यामुळे आम्हाला नाव ठेवायला जागा नाही. खेडमध्ये हिंदू-मुस्लिम एकत्र आणण्याचे काम मी रामदास कदम ने केले आहे नाहीतर इकडे दंगली होत होत्या त्या थांबवल्या. बाळासाहेब आमच्यासारखे वाघ सांभाळायचे तुम्ही देसाई सारख्या शेळ्या, मेंढ्या सांभाळताय. आम्ही मातोश्रीमध्ये खोके पोहोचवले आहेत असा प्रखर हल्ला रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.
अध्यक्षीय भाषणामध्ये यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चौफेर टिका करताना, ही सभा किती विराट आहे हे त्यांना दाखवा, जे येथे पूर्वीच्या सभेत बोलले होते. त्यांना मी जास्त महत्व देत नाही मात्र याच मैदानात (गोळीबार मैदानात) मागील काही दिवसांपूर्वी फुसका बार, आपट बार काढले गेले. तोच तो थायथायाट तेच ते रडगाणं, जे मुंबईत होतं तेच इथेही आणि अन्य ठिकाणीही… फक्त जागा बदलतेय मात्र शब्द तेच असतात. त्यांच्याकडे गद्दार, खोके याशिवाय दुसरे शब्दच नाहीत. किती टिका करायची ती करा, आम्हाला उत्तर द्यायची गरज नाही, या सभेने तुम्हाला उत्तर दिलं आहे. बाळासाहेबांच्या विचारांना घेऊन चालणारी जनता आमच्यासोबत आहे.
जर आम्ही हा निर्णय घेतला नसता तर काय अवस्था झाली असती हे सांगायला नको. कोकण माझं आजोळ आहे, इथे आमची भावकी आहे त्यामुळे कोकण वासिय आमच्यासोबत आहेत.
यांनी सत्तेसाठी आपला पक्ष दावणीला बांधला, धनुष्य बाण गहाण ठेवला तो आम्ही सोडविण्याचे काम केले. बाळासाहेबांच्या विचारांशी यांनी बेईमानी केली तीही केवळ मुख्यमंत्री पदासाठी. निवडणूक आयोगाने देखील शिवसेना आणि धनुष्यबाण आम्हाला दिला. ठाकरेंचा आपल्याला आशीर्वाद आहे त्यामुळे आपल्याला घाबरायचे कारण नाही. तुम्ही केवळ सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. बाळासाहेबांच्या विचारांचे आपण वारसदार आहोत. गद्दारी आम्ही नाही केली, खरी गद्दारी 2019 झाली. खुर्चीसाठी, सत्तेसाठी तुम्ही बॉम्बस्फ़ोट घडवीणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही कसे बसू शकता. राहुल गांधी सावरकरांचा वारंवार अपमान करतात त्यांच्याविरुद्ध तुम्ही काही बोलत नाही, गप्प बसता हे कसलं हिंदुत्व आहे. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला. तुम्ही खोके खोके गद्दार, गद्दार, म्हणून स्वतःचे पाप कितीवेळा झाकणार… तुम्ही म्हणता बाळासाहेब तुमचे वडील होते, मात्र ते आमचं दैवत होते. त्यामुळे माझे वडील माझे वडील म्हणून बाळासाहेबांना छोटे करू नका.
70 वर्षे देश लुटणाऱ्या लोकांबरोबर तुम्ही आहात की 370 कलम रद्द करणाऱ्या बरोबर आहात हे स्पष्ट करा. देशाला परदेशात नाव ठेवणाऱ्या राहुल गांधींना तुम्ही साथ देणार का, ज्यांनी राममंदिर बांधले, ज्यांनी देशाचे नाव उंचावले त्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना साथ देण्यासाठी आम्ही जो निर्णय घेतला तो चुकीचा कसा असू शकतो असा सवाल त्यांनी शेवटी विचारला.
या सभेसाठी मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी जमली होती. या सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर मोठ्या प्रमाणावर टिका करण्यात आली. त्यामुळे यापुढे महाराष्ट्रात एकनाथ शिंदे शिवसेना गट विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अशी चूरशीची राजकीय लढाई पहायला मिळणार आहे यात शंका नाही.