सावधान | वाहने रस्त्यावर लावाल तर कारवाई होणार, ‘पारगाव’ येथे ‘चार’ जणांवर थेट गुन्हा दाखल, ‘केडगावमध्ये’ अशी कारवाई होणार का..?

दौंड : मुख्य रस्ते आणि वर्दळीच्या ठिकाणी आपले वाहन लावून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिक आणि वाहन चालकांना त्रास देणाऱ्या वाहन चालकांवर आता यवत पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. काल पारगाव येथे यवत पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला असून दौंड पोलिस ठाण्यानंतर आता यवत पोलिसांनी अशी कारवाई सुरु केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

रहदारी आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या या चार जणांवर गुन्हा दाखल पारगाव येथे रहादरीस अडथळा होईल अशी वाहने लावल्याप्रकरणी अनिल बबन वनशिव, किसन नामदेव ताकवणे, ज्ञानेश्वर अंकुश बोत्रे आणि केशव नामदेव कदम (सर्व रा. पारगाव ता. दौंड जि. पुणे) यांच्यावर त्यांच्या वाहनांसह भादवी कलम 283 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ची फिर्याद पोलीस नाईक दत्तात्रय काळे यांनी दिली आहे.

केडगाव येथे कारवाई होणार का..? दौंड शहरानंतर यवत आणि पारगाव येथे रहदारीस अडथळा होईल अशी वाहने उभी करणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली आहे. अशीच कारवाई आता केडगाव येथे करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. केडगाव स्टेशन येथे मोठी बाजारपेठ आहे मात्र दुचाकी आणि चारचाकी वाहणचालकांच्या मनमानीमुळे येथे खरेदीसाठी आणि आपल्या दैनंदिन गरजांसाठी येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहक आणि नागरिकांना मोठा फटका बसत आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहन चालक येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहतुकीस अडथळा होईल अश्या पद्धतीने आपली वाहने लावून दिवसभर टाईमपास करताना दिसतात. त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिक आणि ग्राहकांना याचा मोठा त्रास होतो. याठिकाणी केडगाव पोलीस चौकी असून त्यांच्यामार्फत आता अश्या बेदरकार वाहन चालकांवर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.

आपला मोठा वशीला आहे, गाडी पकडायची ताकद नाही काही मुजोर वाहन चालक मुद्दाम आपली चारचाकी, दुचाकी वाहने रस्त्याच्या मधोमध उभी करताना दिसतात. ही वाहने दिवसभर रस्त्यामध्ये उभी राहतात. कुणी हटकले तर आपला वशीला माहित आहे ना, आपल्यावर कारवाई होत नसते, साहेबांना लगेच फोन येईल अशी फुशारकी चहा पीत-पीत मारताना दिसतात. अश्या मुजोर वाहनधारकांवर केडगाव आणि यवत पोलिसांनी कारवाई करून एकदा गुन्हे दाखल केले तर मात्र नागरिकांना होणारा त्रास मोठ्या प्रमाणावर कमी होईल यात शंका नाही.