यवत
भिवंडी येथून दोन चोरट्यांनी 500 सीसी बुलेट चोरून ती यवत मार्गे कर्नाटकला घेऊन जात असताना यवत गुन्हे शोध पोलीस पथकातील पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, पोलीस हवालदार गुरु गायकवाड, पोलीस शिपाई बराते यांनी चोरट्यांचा सुमारे 70 किलोमीटर पाठलाग करून त्यांना जेरबंद केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि 19 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता भिवंडी पोलीस स्टेशनकडून यवत पोलिसांना 2 इसम भिवंडी येथून 2 लाख रुपये किमतीची 500 सीसी बुलेट मोटार सायकल चोरून यवत हद्दीतून कर्नाटक दिशेने जात असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच यवत गुन्हे शोध पोलीस पथकातील पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, पोलीस हवालदार गुरु गायकवाड, पोलीस शिपाई बराते यांनी त्या 2 आरोपिंचा व घेऊन जात असलेल्या बुलेट गाडीचा सुमारे 70 किमी पाठलाग केला. हे आरोपी भिगवण हद्दीतून पुढे जात असताना त्यांना वरील पोलीस पथकाने बुलेट गाडीसह पकडून त्यांना रात्री उशीरा भिवंडी पोलीस पथकाच्या हवाली केले.
सदरची कामगिरी करत असताना या पथकाला पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांचे मार्गदर्शन लाभले. सुसाट वेगात गाडी पळविणाऱ्या या चोरट्यांना पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख,पोलीस हवालदार गुरूनाथ गायकवाड पोलीस शिपाई बराते यांच्या पथकाने मोठ्या धारिष्ट्याने पकडल्याने त्यांचे कौतुक होत आहे.