‛भाईगिरी’ करणाऱ्यांसाठी यवत पोलीसांची ‛स्पेशल ऑफर’, आता एका स्कीमवर मिळणार दुहेरी योजनेचा ‛लाभ’

अब्बास शेख

यवत : यवत पोलिसस्टेशन हद्दीमध्ये भाईगिरी, दादागिरी करणाऱ्यांसाठी आता यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी स्पेशल स्कीम देत अश्या लोकांसाठी स्पेशल ऑफर तयार केली आहे. आता दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे असणाऱ्यांसाठी थेट तडीपारी आणि MPDA अंतर्गत कारवाईचा लाभ मिळणार असून ज्यांना कुणाला ग्रुप आणि टोळके जमवून भाईगिरी, दादागिरी, मारामारी करण्याची हौस असेल त्यांना या दुहेरी योजनेच्या लाभासह अतिशय मोठा असा ‛मोक्का’ अंतर्गत कारवाईचा आयुष्यभराची अद्दल घडवणारा लाभ मिळणार आहे. ज्यामुळे अनेक वर्षे बिगर जामिनीचा येरवडा कारागृहातील मुक्काम आणि विशेष अश्या जेलमधील खास बेचव जेवणासह अधून मधून पोलिसांचा खास महाप्रसाद मिळणार आहे.

भाईगिरी, गुंडगिरी या योजनेत कार्यरत असणाऱ्यांसाठी यवत पोलिसांनी एक स्कीम तयार केली असून या स्कीम नुसार यवत पोलीस स्टेशन हद्दीतील गुंडगिरी करणाऱ्यांची गावनिहाय यादी तयार करण्यात आली आहे ज्यामध्ये या लोकांवर विशेष लक्ष केंद्रित करून ज्यांच्यावर 2 किंवा 2 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत त्यांना विशेष असा तडीपारी आणि MPDA (गल्ली दादा) कायद्याचा महाप्रसाद दिला जाणार आहे ज्यामुळे आपल्या परिसरात राजेशाही थाट करून लोकांना धमकवणाऱ्या गल्ली दादाला एकतर येरवडा जेल किंवा दोन-तीन जिल्हे सोडून अन्य एखाद्या जिल्ह्यात वास्तव्यास राहून कुठेतरी हॉटेलमध्ये धुनी,भांडी किंवा एखाद्या किराणा दुकानात काहिवर्षे पुड्या बांधण्याचे काम मिळणार आहे.

याबाबत यवतचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी माहिती देताना अश्या विविध लोकांची यादी तयार करण्यात आली आहे जे कायम कोणत्या न कोणत्या कारणाने दादागिरी, भाईगिरी आणि मारमारीचे प्रकार करत असतात. ज्यांच्या विरुद्ध माला विषयीच्या गुन्ह्यातील व शरीराविरुद्धच्या गुन्ह्यातील आरोप आहेत त्यांच्यावर पाळत ठेवण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे बेकायदेशीर हत्यार बाळगणाऱ्या लोकांची माहिती गोळा करण्यासाठी गुप्त टीम नेमण्यात आली असून अश्या लोकांना हत्यारासह जेरबंद करून त्यांचे गुंडगिरीचे कंबरडे मोडले जाणार आहे.

त्यामुळे यवत पोलिसांनी अश्या लोकांना आव्हान करताना, सावधान व्हा… भाईगिरी, दादागिरी, मारामारी कराल तर तडीपारी, MPDA आणि मोक्का कारवाईला तयार रहा असा गंभीर इशाराच देऊन टाकला आहे.