अब्बास शेख
दौंड : दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाणे सध्या खुनांच्या तपासात अग्रेसर असल्याचे दिसत आहे. गेल्या आठवड्यामध्ये वरवंड येथील खूनाला सुमारे दीड वर्षांनंतर वाचा फोडण्यात यवत चे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे आणि त्यांच्या टीमला यश आले होते. या तपासात त्यांना पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांचे मार्गदर्शन लाभले होते.
तसाच काहीसा खुनाचा प्रकार चौफुला येथे घडला असून ३९ वर्षीय संतोष पवार (रा.सध्या चौफुला, नवे गाव, मूळ कडेठाण ता.दौंड) याचा आकस्मिक मृत्यू झाला असल्याची तक्रार देण्यात आल्यानंतर यवत पोलिसांनी केलेल्या गुप्त तपासामध्ये हा मृत्यू त्याची पत्नी पल्लवी पवार (वय २८ रा.सध्या चौफुला नवे गाव, ता.दौंड) हिने आठ दिवसांपूर्वी केलेल्या मारहाणीमुळेच झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार दोन महिन्यांपूर्वी संतोष आणि पल्लवी हे पती,पत्नी कामाच्या शोधात चौफुला ता.दौंड येथील नव्या गावात राहण्यासाठी आले होते. संतोष पवार याला दारू पिण्याचे व्यसन असल्याने त्याची पत्नी पल्लवी पवार ही त्याला वारंवार समजावून सांगूनही तो दारू पिण्याचे कमी करत नव्हता. दि.२२ जुलै रोजी रात्री साडे नऊ ते दहाच्या दरम्यान संतोष हा पुन्हा दारू पिऊन घरी आला त्यावेळी चिडलेल्या पल्लवीने त्याला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. पल्लवीने त्याला हात, पायावर मारहाण करत असताना एक फटका संतोष याच्या डोक्याला लागला होता.
एक दोन दिवसानंतर संतोष याला चक्कर येणे, उलट्या होणे असा प्रकार सुरू झाला. दि ३० रोजी त्याला अशीच मोठी चक्कर आली त्यामुळे त्यास ससून येथे घेऊन जाण्यात आले मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी जाहीर केले. त्याचा आकस्मिक मृत्यू झाला असावा असे सर्वांना वाटत होते तशी माहितीही यवत पोलिसांना देण्यात आली मात्र यवतचे पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांना हा प्रकार संशयास्पद वाटत असल्याने त्यांनी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार (ASI) बाळासाहेब गाडेकर, विशाल जाधव, सोमनाथ सुपेकर, कापरे, महिला पोलीस चाफळकर या टीमच्या सहाय्याने अधिक तपास सुरू केला.
तपास सुरू असताना संतोष याचा मृत्यू त्याची पत्नी पल्लवी हिने केलेल्या मारहाणीमुळेच झाला असल्याची गुप्त माहिती या टीमला समजली. त्यातच संतोष याचा शवविच्छेदन अहवालही आला ज्यामध्ये संतोष चा मृत्यू डोक्याला मार लागल्याने झाला असल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे आणि त्यांच्या टीमने महिला पोलिसांना सोबत घेऊन पल्लवी पवार हिला राहत्या घरातून अटक केली. सध्या यवत पोलिसांनी विविध गुन्ह्यांच्या तपासाचा धडाका लावला असून त्यांच्या तपासामध्ये अनेक घटना उघडकीस येत असल्याने, ‛गुन्हा करताना आपल्याला कोणी पाहत नाही, त्यामुळे आपल्याला काही होणार नाही’ असा समज करून गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचे मात्र धाबे दणाणले आहेत.