प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी उद्योग क्षेत्राने कामगारांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

पुणे : जिल्ह्यात बाहेरील राज्यातून किंवा जिल्ह्यातून आलेले कामगार मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांची रहात असलेल्या ठिकाणी मतदार नोंदणी करण्यासाठी उद्योगांनी अनुकूल वातावरण निर्माण करावे आणि त्यांना आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार जागृती मंचाबाबत माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील औद्योगिक आस्थापनांच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, उपसचिव तथा सह मुख्य निवडणूक अधिकारी उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत आणि औदयागिक आस्थापनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री.देशपांडे म्हणाले, पुणे हे औद्योगिक शहर असल्याने उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ कार्यरत आहे. देशाच्या विविध भागातून पुण्यात नागरिक स्थलांतरीत झालेले असल्याने त्यांना मतदार नोंदणी, मतदान केंद्र, व त्यांच्या मतदानांच्या हक्काविषयी जागृत करणे आवश्यक आहे. भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक पात्र मतदाराच्या नोंदणीवर भर दिला आहे. भारतीय राज्य घटनेने मतदाराला मतदानाचा हक्क दिला आहे आणि हा हक्क त्याला बजावता यावा यासाठी उद्योग जगताने सहकार्य करावे.

दरवर्षी मतदार यादी अद्ययावत करण्यात येते आणि त्यात आवश्यक दुरुस्ती करण्यात येते. सद्यस्थितीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु असून 1 नोव्हेबर रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच 1 नोंव्हेबरपासून 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकवर आधारित मतदार नोंदणी सुरू राहणार आहे. तसेच, 1 नोव्हेबर ते 30 नोव्हेबर या कालावधीत दावे व हरकती स्विकारण्यात येणार असून 5 जानेवारी 2022 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

औद्योगिक आस्थापनांनी आपल्या अधिनस्त कामगार वर्गास या कार्यक्रमाची माहिती देवून स्वत:चे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नोंदणी करण्याचे आवाहन करावे, तसेच त्यांना नोंदणीसाठी सहकार्य करण्यासाठी समन्वयक अधिकारी नियुक्त करावा. निवडणूक आयोगातर्फे देण्यात येणारी मतदार जागृतीविषयक माहिती कामगारांपर्यंत पोहोचविण्यासाठी सहकार्य करावे. माहिती फलक आणि छोट्या संदेशाद्वारे जनजागृती उपक्रमात सहभाग घ्यावा. मतदार नोंदणीसाठी एक किंवा अधिक उद्योगांनी मिळून शिबिराचे आयोजन करावे. आपल्या कामागरांचेही मत निवडणुकीत महत्वाचे असल्याने मतदार जागृती मंचाच्या माध्यमातून उपयुक्त उपक्रम राबवावे असे आवाहन त्यांनी केले.

मतदार नोंदणीसाठी nvsp.in या संकेतस्थळाचा किंवा ‘वोटर हेल्पलाईन’ या मोबाईल ॲपचा उपयोग करावा.भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग नागरिकांकरिता पीडब्ल्युडी ॲप उपलब्ध करुन दिले असून या ॲपचा वापर त्यांच्या नोंदणीसाठी होणार आहे. नवीन मतदार नोंदणीसाठी जन्मतारखेचा पुरावा, निवासाचा पुरावा आवश्यक आहे. छायाचित्र नसल्याने कोणाचेही नाव मतदार यादीतून वगळले जात नसून निवडणूक विभागातर्फे केलेल्या सर्वेक्षणात मतदार दिलेल्या पत्त्यावर रहात नसल्याचे दिसून आल्यावरच किंवा मयत असल्यास नाव वगळण्याची प्रक्रिया करण्यात येते असेही श्री.देशपांडे म्हणाले.

श्री.राव म्हणाले, कामगारांच्या निवासाचा पुरावा उपलब्ध करून त्यांची मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी उद्योगांचे सहकार्य आवश्यक आहे. प्रशासनातर्फेदेंखील विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जनजागृती उपक्रमात उद्योगांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविकात श्रीमती सावंत यांनी मतदार जागृती मंचाबाबत माहीती दिली.