women strike : दौंड भाजी मंडई परिसरातील मुतारी त्वरित न हटविल्यास महिलांकडून आंदोलनाचा इशारा



|सहकारनामा|

दौंड : शहरातील गांधी चौक येथील नगरपालिकेच्या मुख्य भाजी मंडई परिसरातील मुतारी त्वरित हटविण्याची मागणी (women strike) स्थानिक महिलांकडून करण्यात आली असून यावर त्वरीत कारवाई न केल्यास महिलांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.     महिलांच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्षा शितल कटारिया व उपनगराध्यक्ष विलास शितोळे यांची भेट घेत सदर मागणीचे निवेदन दिले. 

सदरची मुतारी भाजी मंडई प्रवेश द्वारा शेजारीच असल्याने मंडई मध्ये खरेदीसाठी येणाऱ्या महिलांना तसेच स्थानिक महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या मुतारीतील घाण व उग्र वासाने नागरिक त्रस्त झाले आहेत, अशा परिस्थितीमुळे रोगराई वाढून स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. मंडईला येणाऱ्या महिलांना लज्जा उत्पन्न होईल अशी परिस्थिती या ठिकाणी पहायला मिळत आहे. सदरची मुतारी नगर पालिकेची असल्याने त्याचा वापर करणाऱ्यांना काही बोलताही येत नाही ही अडचण येत आहे.

त्यामुळे या ठिकाणची मुतारी काढून दुसऱ्या पर्यायी जागेत बांधण्यात यावी अशी मागणी विशेषतः स्थानिक महिलांनी केली आहे, मुतारी त्वरित हटविली नाही तर महिलांनी तीव्र आंदोलनाचा इशाराही नगरपालिकेला दिला आहे.