रांजणगावमधील महिलेच्या हत्येमागे ‘पतीच’ निघाला आरोपी | ‘या’ कारणामुळे केला ‘पत्नी’चा निर्घृण ‘खून’

अब्बास शेख

पुणे : दौंड तालुक्यातील पारगावजवळ असणाऱ्या रांजणगाव सांडस (ता.शिरूर) येथे एका विवाहित महिलेचा रशीने गळा आवळून आणि विजेचा करंट देऊन खून करण्यात आला होता. या घटनेमुळे पारगाव-रांजणगावमध्ये मोठी खळबळ माजली होती. आता या खुनाचा उलगडा झाला असून फिर्यादी असणारा पतीच आता यातील आरोपी म्हणून समोर आला आहे.

दि. 3 जुलै रोजी रांजणगाव सांडस येथे शितल स्वप्नील रणपिसे या 23 वर्षीय विवाहितेचा तीच्या राहत्या घरात रशीने गळा आवळून आणि विजेचा करंट देऊन खून करण्यात आला होता. याबाबत शितलचा पती स्वप्नील शामराव रणपिसे (वय 27) याने यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. यवत पोलिसांनी शिरूर पोलिस ठाण्याकडे हा गुन्हा वर्ग केला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा अन्वेशन विभाग आणि शिरूर पोलिस यांनी या घटनेचा तपास सुरु केला असता त्यांना यात महत्वाची माहिती हाती लागली आणि त्यातून फिर्यादी स्वप्नील रणपिसे हाच यातील आरोपी असल्याचे आणि त्यानेच हा खून केल्याचे निष्पन्न झाले.

दि. 3 जुलै रोजी मयत शितलचा पती स्वप्नील हा दुपारी दोन वाजता कामावरून घरी आल्याचे तो फिर्यादीमध्ये सांगत होता मात्र पोलिसांना त्याच्यावर संशय बळावला होता. स्वप्नील याने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याला त्याची पत्नी शितल हि घरामध्ये मृत अवस्थेत आढळली होती. तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तिने अज्ञात कारणावरून तिचा निळ्या रंगाच्या रशीने गळा आवळुन व काळया रंगाच्या वायरने विजेचा करंट देवून खून केला असे त्याने फिर्यादीत म्हटले होते. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी मृत शितलचे सासरे हे काष्टी ला गेले होते तर तीची सासू ही त्यांच्या कापड दुकानात गेली होती असे सांगितले होते.
शितल चा खून नेमका कोणी आणि का केला याबाबत स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिस तपास करत होते. यावेळी त्यांनी स्वप्नील याची कसून चौकशी केली असता त्यानेच हा खून केल्याचे कबूल केले.

‘या’ कारणामुळे केला पत्नीचा निर्घृण खून – स्वप्नील रणपिसे आणि त्याची पत्नी शितल यांच्यामध्ये वारंवार खटके उडत होते. वेगवेगळ्या कारणावरून शितल स्वप्नील ला टोमणे मारत असायची याचा मोठा राग स्वप्नील मनात होता आणि याच रागातून त्याने आपली पत्नी शितलचा रशीने गळा आवळून आणि विजेचा करंट देऊन निर्घृण खून केला असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. आरोपी स्वनिल रणपिसे याला न्यायालयाने दहा जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून पुढील तपास शिरूरचे पोलिस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.