दौंड : कुरकुंभ (ता. दौंड) येथील एका महिलेवर दोघा मित्रांनी बलात्कार केल्याची घटना भयानक घटना घडली आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून किशोर सुद्रिक व दादा शेलार (दोघे रा. बारडगाव सुद्रिक,ता. कर्जत, जिल्हा अहमदनगर) या दोघांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे कुरकुंभ येथील देवीच्या मंदिर परिसरात पूजा अर्चेच्या साहित्याचा व्यवसाय करते. दि.16 मे 2019 रोजी यातील आरोपी कुरकुंभ देवीच्या दर्शनाला आला होता पीडित महिलेच्या दुकानातून त्याने पूजेचे साहित्य विकत घेतले. त्यानंतर आरोपी वारंवारपणे महिलेच्या दुकानात येऊ लागला, त्याने महिलेसोबत ओळख वाढविली. एके दिवशी, देवीचा अभिषेक करावयाचा आहे असे सांगत आरोपीने महिलेचा मोबाईल नंबर घेतला. यानंतर दोघांचे फोनवर बोलणे सुरू झाले. डिसेंबर (2021) महिन्यामध्ये आरोपी पुन्हा महिलेच्या दुकानात आला व मला थोडी अडचण आहे असे सांगून त्याने महिलेकडून चार दिवसात पैसे परत करतो म्हणून हात उसने 5 हजार रुपये घेतले होते.
चार-पाच दिवस झाल्यानंतर महिलेने आरोपीस पैसे मागण्यास सुरुवात केली. आरोपीने आज देतो, उद्या देतो म्हणून टाळाटाळ केली. दि.11 मार्च 2021 रोजी रात्री 10.30 वा. दरम्यान आरोपीने महिलेस सांगितले की मी तुमचे पैसे परत देण्याकरिता आलो आहे, तुमचे घर माहित नाही, मला तुमच्या घराचा पत्ता सांगा मी तेथे येतो. म्हणून महिलेने त्याला आपल्या घरचा पत्ता सांगितला. आरोपी आपल्या मित्राला घेऊन महिलेच्या घरी पोहोचला व ती एकटी आहे हे पाहून दोघांनी तिच्यावर बलात्कार केला.
याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, तुझा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून तुझी इज्जत घालून टाकीन अशी धमकीही आरोपीने पीडित महिलेला दिली. या घटनेनंतर सुद्धा दोन्ही आरोपी महिलेला वारंवार फोन करून धमकी देऊ लागले हे सहन न झाल्याने पीडित महिलेने दोघा आरोपींविरोधात दौंड पोलिसांकडे तक्रार नोंदविली. पुढील तपास सहा. पो. निरीक्षक तुकाराम राठोड करीत आहेत.